court

तिरुअनंतपूरम : केरळातील सिस्टर अभया हत्याकांड प्रकरणात सीबीआय कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. तिरुअनंतपूरम येथील एका सीबीआय न्यायालयाने २१ वर्षांची सिस्टर अभया यांच्या हत्या प्रकरणात कॅथोलिक पाद्री आणि एका ननला मंगळवारी दोषी ठरिवले. या प्रकरणी या दोषींना बुधवारी शिक्षा ठोठावली जाणार आहे.

सिस्टर अभयाचा मृतदेह १९९२ रोजी कोट्टायम येथील एका कॉन्व्हेंटमधील विहिरीत आढळला होता. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सनल कुमार यांनी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला. तब्बल 28 वर्षानंतर या प्रकरणी सीबीआय कोर्टाने निर्वाळा दिला आहे.

पुराव्याअभावी फादरची सुटका

फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांच्या विरोधातील हत्येचे आरोप सिद्ध झाले असल्याचे न्यायाधीश म्हणाले. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी फादर फुथराकयाल यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. थॉमस कोट्टर कोट्टयम येथील बीसीए कॉलेजमध्ये मनोविज्ञान शिकवितात. ते तत्कालीन बिशपचे सचिवही होते. त्यानंतर ते कोट्टायम कॅथोलिक चर्चचे चान्सलरही झाले. या प्रकरणी एका ननलाही दोषी ठरविण्यात आले आहे. ती सिस्टर अभयाच्या हॉस्टेलमध्येच राहत होती व इन्चार्जही होती.

न्यायाच्या प्रतिक्षेत आईवडिलांचाही झाला मृत्यू

युवा ननचा मृतदेह सेंट पियूस कॉन्व्हेंटच्या विहिरीत आढळल्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर न्यायालयाचा निर्णय आला आहे. अभयाच्या आईवडिलांचाही काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यातच त्यांचे आयुष्य खर्ची गेले.

पोलिसांनी म्हटले होते आत्महत्या

या प्रकरणाची सर्वप्रथम स्थानीक पोलिस आणि त्यानंतर गुन्हे शाखेने चौकशी केली होती व हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे म्हटले होते. सीबीआयने २००८ मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. या प्रकरणाची सुनावणी गेल्यावर्षी २६ ऑगस्ट रोजी सुरु झाली होती आणि अनेक साक्षीदारांनी घुमजाव केले होते.

पाद्री-ननमध्ये होते अवैध संबंध

फिर्यादी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अभयावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. पाद्री आणि ननच्या अवैध संबंधाची तिला माहिती होती यावरूनच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता.