selfie

डांग जिल्ह्यात सेल्फी काढताना दिसल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई(Selfie Banned In Dang District) होणार आहे. दक्षिण गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात सापुतारा हे निसर्गसौंदर्याने नटलेलं, लोकप्रिय हिलस्टेशन आहे. तसेच तिथे अनेक धबधबेही (Waterfalls) आहेत.

    डांग: सेल्फी घेणं आजकाल खूप कॉमन झालं आहे. मात्र अनेकदा हे सेल्फी जीवावरही बेतले आहेत. चांगल्या, आकर्षक, धाडसी सेल्फीसाठी कोणत्याही थराला जाताना तरुणाई धोक्याचाही विचार करत नाही. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून, जगभरात सेल्फीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी निम्म्यांचा मृत्यू भारतात झाला आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरातच्या (Gujarat) डांग जिल्ह्यात (Dang) सेल्फी काढणं (Clicking a Selfie Is A Criminal Offense) हा गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.

    डांग जिल्ह्यात सेल्फी काढताना दिसल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणार आहे. दक्षिण गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात सापुतारा हे निसर्गसौंदर्याने नटलेलं, लोकप्रिय हिलस्टेशन आहे. तसेच तिथे अनेक धबधबेही (Waterfalls) आहेत. कोरोनाशी निगडित असलेले निर्बंध हळूहळू शिथील होऊ लागल्याने आणि पावसाळा सुरू झाल्याने सापुतारा आणि डांग जिल्ह्यातल्या अन्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. अशा पर्यटनस्थळी गेल्यावर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच होतो, मात्र दुर्घटना होण्याचा धोका पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात असतो.

    या पार्श्वभूमीवर, डांग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून लागू असलेल्या सेल्फीबंदीच्या निर्बंधांची नवी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार डांग जिल्ह्यात कोणालाही सेल्फी काढताना पकडलं गेल्यास त्या व्यक्तीवर क्रिमिनल ऑफेन्सच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाऊ शकते.

    धोकादायक ठिकाणी जाऊन लोक सेल्फी काढतात. त्यामुळे दरीत पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही व्यक्तींचा त्यात मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले आहेत .

    जुलै २०१८ मध्ये सापुतारा येथे एक मनुष्य सेल्फी घेताना दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. ऑगस्ट २०१८ मध्ये सापुताराच्या जवळच असलेल्या गिरा धबधब्याजवळ (Gira Waterfall) सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. या आणि अशा सगळ्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने होर्डिंग लावून पर्यटकांना धोक्याची कल्पना दिली आहे आणि सेल्फी न काढण्याचं आवाहनही केलं आहे. मात्र त्यापुढे जाऊन आता अशा ठिकाणी सेल्फी काढणं हा गुन्हाच ठरवला जाणार असल्याचा निर्णयही घेतला गेला आहे. पर्यटकांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

    सेल्फीमुळे झालेले मृत्यू या विषयावर अमेरिकेतल्या ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ (US National Library of Medicine) या संस्थेने अभ्यास केला. त्या अभ्यासाचा अहवाल ऑनलाइन उपलब्ध आहे. त्या संस्थेच्या नोंदीनुसार, ऑक्टोबर २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सेल्फी काढण्यामुळे १३७ दुर्घटना जगभरात घडल्या. त्यात २५९ जणांचा मृत्यू झाला. त्यातले सर्वाधिक म्हणजे ५० टक्क्यांहून मृत्यू भारतातले असून, त्याखालोखाल रशिया, अमेरिका आणि पाकिस्तानातल्या मृत्यूंचा क्रमांक लागतो. बुडणं, उंचावरून खाली पडणं किंवा वाहन दुर्घटना असं या दुर्घटनांचं स्वरूप आहे. मृतांचं सरासरी वय २२.९४ वर्षं आहे. त्यात ७२.५ टक्के पुरुष, तर २७.५ टक्के स्त्रियांचा समावेश आहे. धोकादायक वर्तनामुळे घडलेल्या अपघातांची संख्या जास्त आहे, असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.