तेलंगणा भाजपच्या नेत्याला वक्तव्य भोवले

    तेलंगण(Telangana)चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर (KCR) यांच्याविरोधात चिथावणी देणारे वक्तव्य केल्यामुळे भाजप (BJP) नेते जिट्टा बाळकृष्ण रेड्डी (jitta balakrishna reddy) यांना अटक (Arrest) करण्यात आली. भाजपच्या तेलंगण शाखेने २ जून रोजी तेलंगण स्थापनादिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी व्यासपीठाचा गैरवापर केला आणि चिथावणी दिली, असा आरोप आहे. त्यांना घाटकेशर टोल गेटपाशी अटक करण्यात आली.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाला होता. घटनात्मक पदावर असलेल्या आणि राज्यातील जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या एका व्यक्तीचा प्रहसनातून अवमान करण्यात आला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत तेलंगण राष्ट्र समितीच्या सोशल मीडिया शाखेचे सदस्य वाय. सतीश रेड्डी यांनी तक्रार दाखल केली.

    चित्रफितीबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रहसन सादर केलेल्या कलाकारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मद्यपी, फसवणूक करणारे असा उल्लेख केला. त्यांनी वैयक्तिक टीका केली. लोकनियुक्त सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची अशी बदनामी करणे आणि त्यांना लक्ष्य करण्याचे असे कृत्य लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे.