सुरतमध्ये पोलादाच्या भुकटीपासून तयार केला पहिला महामार्ग

    पोलाद(Iron)निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन असलेल्या स्टील स्लॅग(Steel Slag)पासून (पोलादाची भुकटी) तयार केलेल्या पहिल्या सहापदरी महामार्गाचे (Highway) सूरतमध्ये (Surat) लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह (Ramchandra Prasad Singh) यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. सुरत बंदराला शहराशी जोडणारा हा महामार्ग आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे संपत्तीमध्ये रुपांतर (Conversion Of Waste Into Assets) करून चक्रीय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमतेला चालना देण्याची गरज मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी व्यक्त केली.

    जगभरात सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असल्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०२१ च्या भाषणात व्यक्त केली होती. याची आठवण करुन देत सिंह यांनी यासंदर्भात विशेष उल्लेख केला. अशा परिस्थितीत, चक्रीय अर्थव्यवस्था ही काळाची मागणी आहे. या मागणीला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून अनिवार्य करणे आवश्यक असल्याचे सिंह म्हणाले. प्रक्रिया केलेल्या पोलादाचा १०० टक्के वापर करुन तयार केलेला हा रस्ता हे कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करण्याचे आणि पोलाद संयंत्रांची शाश्वतता सुधारण्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले.

    उत्पादन प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांमध्ये नैसर्गिक समुच्चय घटकापेक्षा चांगले गुणधर्म असतात. त्यामुळं रस्ते बांधणीत अशा सामग्रीचा वापर केल्याने टिकाऊपणा वाढेलच शिवाय बांधकामाचा खर्च कमी होण्यासही मदत होईल. या रस्त्यापासून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग बांधकामात या स्टील स्लॅगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या दृष्टीने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी केला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.