विमानाचं लँडिंग तीनवेळा अयशस्वी, प्रवासी रडून हैराण; वैमानिकानं नक्की काय केलं आणि काय झालं…

वैमानिकानं जवळपास तीन वेळा प्रयत्न करुनही हे विमान लँड करण्यात यश आलं नाही. यानंतर तब्बल एक तास विमान हवेतच राहिल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काही प्रवासी तर रडूच लागले. यानंतर विमान पुन्हा एकदा अहमदाबादकडे घेऊन जाण्यात आलं.

    अहमदाबाद : अहमदाबादहून जैसलमेरला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या प्रवाशांना अक्षरश: रडू कोसळले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे विमान जैसलमेरच्या विमानतळावर लँडिंग करू शकलं नाही. वैमानिकानं जवळपास तीन वेळा प्रयत्न करुनही हे विमान लँड करण्यात यश आलं नाही. यानंतर तब्बल एक तास विमान हवेतच राहिल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काही प्रवासी तर रडूच लागले. यानंतर विमान पुन्हा एकदा अहमदाबादकडे घेऊन जाण्यात आलं.

    याठिकाणी यशस्वी लँडिंग केल्यानंतर तब्बल दोन तासानंतर दुसऱ्या वैमानिकासह हे विमान जैसलमेरला पाठवण्यात आलं आणि अखेर या विमानाचं जैसलमेरमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचं एसजी ३०१२ या विमानानं अहमादबादहून शनिवारी १२.०५ च्या आसपास जैसलमेरसाठी उड्डाण केलं होतं. वैमानिकानं या विमानाचं लँडिंग करण्यासाठी प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. यानंतर पुन्हा दोन वेळा विमान आकाशात उडवून पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे विमानाचं लँडिंग शक्य झालं नाही.

    यादरम्यान तब्बल एक तास हे विमान हवेतच राहिलं. दोन वाजताच्या आसपास वैमानिक हे विमान पुन्हा अहमदाबादला घेऊन गेला. याठिकाणी २.४० ला विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. यानंतर दोन तासांनी या विमानाचं पुन्हा जैसलमेरसाठी उड्डाण करण्यात आलं, अखेर पाच वाजून पंधरा मिनिटांनी हे विमान सुरक्षितरित्या जैसलमेरमध्ये लँड झालं आहे.