वसईतील १०० फुटी रस्ता अनधिकृत गॅरेज आणि पार्किंगला आंदण!

वसई. वसईतील रहदारी साठी तयार करण्यात आलेला शंभर फुटी रस्ता अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजला आंदण दिल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून लहानसहान अपघातही घडत आहेत.

वसईची पुर्व-पश्चिम बाजू जोडणाऱा उड्डाणपूल आणि नालासोपाराला जाणाऱ्या सन सिटी रस्त्यामधील प्रमुख दुवा असलेला शंभर फुटी रस्ता गॅरेज आणि पार्किंग मध्ये गडप झाला आहे.दिवानमान, चुळणे, सनसिटी, भुईगाव, गास या गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे.

काही वर्षांपूर्वी हा रस्ता सहापदरी करण्यात आला होता. तो आता फक्त दुपदरी राहीला असून उरलेले दोन्ही बाजूचे चार पदर गॅरेज आणि पार्किंग आणि अनधकृत फेरीवालेह्यांनी हडप केला आहे. त्याशिवाय रस्त्याच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतही वाहने उभी करण्यात येत आहेत. रस्त्यावरील गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना त्यातील इंधन पडून रस्ते निसरडे झाले आहेत.त्यावरून पादचारी आणि दुचाकी वाहने घसरून पडत अपघात घडत आहेत.

त्यामुळे अनेकदा तक्रारी करून हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी महापालिकेकडे केली. त्यावर फक्त नोटिसा बजावून महापालिकेने आपले कर्तव्य बजावले आहे.

लॉक डाऊनमध्ये इतरत्र काम असल्यामुळे वेळ मिळाला नाही.लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल-

वाहतूक पोलीस निरीक्षक विलास सुपे

रस्ता मोकळा करण्यासंदर्भात त्यांना नोटिसा बजावल्या आहेत-

सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्साल्विस