प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वसई विरार (Vasai- Virar) :  शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणूकीनंतरच महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ३५ गावातील मतदारांकडून पालिका निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत जन प्रबोधनासाठी बैठकाही होणार आहेत.

वसई विरार (Vasai- Virar) : पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणूकीनंतरच महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ३५ गावातील मतदारांकडून पालिका निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत जन प्रबोधनासाठी बैठकाही होणार आहेत.

वसई-विरार महापालिकेतून ३५ गावे वगळण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून लढा सुरु आहे. या लढ्यात उपोषण,पोलीसांचा लाठीचार्ज, अश्रु धुराचा वापर, लोकप्रतिनिधींवर हल्ला, चुल बंद-गांव बंद अशी अनेक आंदोलने झाली.या आंदोलनातून प्रस्थापितांचा निवडणुकीत पराभवही झाला होता. तर गावे वगळण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु होती. तरीही पालिकेतून गावे वगळण्यात आली नाही. आजही आगाशी, कोफराड, बापाणे, ससुनवघर, भुईगांव, गास, गिरीज, कौलार, मर्देस,नवाळे, निर्मळ, नाळे, वाघोली, दहिसर, राजोडी, उमराळे, वटार, चांदीप, कशिदकोपर, कसराळी, कोशिंबे, चिंचोटी, वदळ, कामण, कणेर, कोल्ही, मांडवी, शिरसाड, चोबारे, किरवली, मुळगांव, सालोली, वडवली ही गावे पालिकेतून मुक्त होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हरकत घेऊन माजी महापौर राजीव पाटील यांनी गावे वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली होती. याच मुद्यावर गावे वगळण्याचा निर्णय अडकून पडला आहे. गेल्या आठवड्यात २९ गावे पालिकेतून वगळण्याचा विचार राज्य सरकारने न्यायालयात सादर केला. मात्र, वगळलेल्या गावांची स्वतंत्र ग्रामपंचायती कि नगरपरिषद स्थापन करायची याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ लागेल असे सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पुढील ३ महिन्यात गावे वगळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

दरम्यान,कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापुर्वीच निवडणूका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे अशी कुजबुज सुरु आहे. त्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून, अनेक संघटना त्यात सहभागी होणार आहेत. येत्या काही दिवसांत गावागावांमध्ये बैठकाही होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिकेतून गावे वगळण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे हा निर्णय कटु असला तरी गावांच्या अस्तित्वासाठी तो घ्यावाच लागणार आहे. तशी चाचपणी सुरु असून,ग्रामस्थांच्या सुचना विचारात घेतल्या जात आहेत -- मिलींद खानोलकर-संस्थापक अध्यक्ष, मी वसईकर अभियान.

गावे वगळली जावीत, ही प्रबळ इच्छा आहे. कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतोय.म्हणून निवडणुकीला सामोरे न जाणे हा पर्याय असू शकत नाही. निवडणुकीला आम्ही  सामोरे जाणार— समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार