प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वसई विरार पालिकेने केलेल्या परीक्षणात ३९ रुग्णालयातील अग्नी सुरक्षा(Fire Safety) रामभरोसे असल्याचं उघड झाले आहे.

    रविंद्र माने, वसई : विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(Vijay Vallabh Hospital) १५ जणांचे बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वसई विरार पालिकेने केलेल्या परीक्षणात ३९ रुग्णालयातील अग्नी सुरक्षा(Fire Safety) रामभरोसे असल्याचं उघड झाले आहे.

    एप्रिल महिन्यात विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत १५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.रुग्णालयांनी फायर ऑडिट केले की नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता.त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अग्निशमन विभागाला आदेश देऊन सर्व हॉस्पिटल मधील अग्निसुरक्षेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यावर केलेल्या परीक्षणात ४५ कोरोना रुग्णालयांपैकी फक्त ६ रुग्णालयांतील अग्निसुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

    ३९ रुग्णालयांतील अग्निसुरक्षा व्यवस्था यंत्रणेबाबत त्रुटी निदर्शनास आल्याने त्यांना विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार १९ रुग्णालयांनी तातडीने कार्यवाही सुरु केलेली आहे. मात्र त्यापैकी २० रुग्णालयांनी अद्याप कार्यवाही सुरु केलेली नाही. यामुळे या २० रुग्णालयांना आपल्या रुग्णालयांवर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत ७ दिवसांत स्वयंस्पष्ट लेखी खुलासा सादर करावा अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाने दिली.