कृषी परंपरेची दिवाळी होतेय लुप्त, जनावरांच्या संख्येत घट, यंत्रांचा अधिक वापर

पूर्वापार चालत आलेली ग्रामीण भागातील दिवाळीची परंपरा आधुनिक युगात यंत्रांच्या वापरामुळे लुप्त होतेय. जनावरे कमी होऊ लागली आहेत. तर मजूर मिळत नसल्याने पडीक जमिनीत वाढ होत आहे. पूर्वी होणा-या झुंजींसह ग्रामीण भागातील दिवाळीची अगळी वेगळी पंरपरा काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्याचे चित्र गावखेडयांत पहावयास मिळत आहे. अशी खंत जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.

विक्रमगड : ग्रामीण भागात कृषी पंरपरेची आगळी वेगळी दिवाळी शेतकरी साजरी करीत असत. मात्र, आता ट्रॅक्टरच्या वापरामुळे जनावरे कमी होत चालली आहेत. त्यामुळे ही परंपराच लुप्त होत चालली आहे.

विक्रमगड तालुक्यातील जाणकार शेतकरी व जेष्ठ नागरिकांना कृषी पंरपरेतील दिवाळी बाबत विचारणा केली असतांना दीपावली, बलि प्रतिपदा व पाडवा या दिवशी ग्रामीण भागांत सकाळीच गावातील शेतकरी आपल्या गोठयातील गाय, बैल, म्हैस यांना स्वच्छ धुऊन, रंगाने व फुग्यांनी सजवतात. नंतर गावाच्या वेषीवर(चौकात) पेंढा किंवा गवत पेटवून (आग लावुन) त्यावरुन गुरांना उडविले जाते.

या मागची अशी भावना आहे की, दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्नीवरुन उडविल्यास त्यांना वर्षभरात कोणतेही आजार होत नाहीत. तसेच शेतकरी आपल्या दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पुंजके ठेवून त्या पुंजक्यावर झेंडूची फुले ठेवतात. नंतर हे पुंजके सुकल्यावर आपल्या शेतामध्ये टाकतातय त्यामुळे शेतात चांगले पीक येते, अशी प्रथा पूर्वापार चालत आल्याचे ते सांगतात.

दिवाळीच्या दिवशी रेडे, बैल किंवा बोकड यांच्या झुंजी लावल्या जातात. त्या बघण्यासाठी गावातील लहानांपासून ते थोरांपर्यत सर्वच माळरानावर गर्दी करुन झुंझीचा आनंद घेतांना दर दिवाळीला दिसतात. त्यानंतर समुहाने प्रत्येकाच्या घरी जाउन फराळाचा आस्वाद गावाकडची मंडळी घेतांना दिसतात. अशी पूर्वापार चालत आलेली ग्रामीण भागातील दिवाळीची परंपरा आहे. परंतु सध्या आधुनिक युगामध्ये यांत्रिक युगामुळे शेतीच्या कामातील ट्रेक्टरच्या वापरामुळे जनावरे कमी होऊ लागली आहेत. तर मजूर मिळत नसल्याने पडीक जमिनीत वाढ होत आहे. पूर्वी होणा-या झुंजीसह ग्रामीण भागातील दिवाळीची अगळी वेगळी पंरपरा काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्याचे चित्र गावखेडयांत पहावयास मिळत आहे. अशी खंत जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.