boisar midc road

बोईसर एमआयडीसी- चिल्हार रस्त्याच्या(boisar midc chilhar road) चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधीं रुपयांचा निधी खर्च झाला आहे. नव्याने तयार केलेल्या रस्त्याच्या आराखड्यात अजूनही धोकादायक वळणे(dangerous turns) आहेत.

पालघर : बोईसर एमआयडीसी- चिल्हार रस्त्याच्या(boisar midc chilhar road) चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधीं रुपयांचा निधी खर्च झाला आहे. नव्याने तयार केलेल्या रस्त्याच्या आराखड्यात अजूनही धोकादायक वळणे(dangerous turns) आहेत. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच अशा वळणांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

अपघातांची संख्या कमी करण्यासाठी बोईसर – चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, सध्या त्याउलट स्थिती पहायला मिळत आहे. सध्या या रस्त्याच्या कामाला गती दिसून येत असली आणि कोट्यावधी निधी मंजूर असला तरी या रस्त्यावरील धोकादायक वळणे काढली गेली नाहीत. ही वळणे का काढण्यात आली नाहीत, असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

या रस्त्यावरील वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होती. ती अधिग्रहित करण्यात आलेली नाही. आता चौपदरीकरणाने हा रस्ता अधिक वेगवान झाला असला तरी अनेक वळणे पूर्वीप्रमाणेच असल्याने ती धोकादायक ठरणार आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासन विभाग गांभीर्याने विचार करीत नसल्याचे दिसत आहे.

मात्र, प्रत्यक्षात चालू वर्षी रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. तरी कामाची सद्यस्थिती बघितल्यास धोकादायक वळणे तशीच ठेवली आहेत त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या रस्त्यावरील वारांगडे येथील विराज कंपनी जवळील वळण, पाच बंगला कॉलनी समोरील वळण, वाघोबा खिंड चढताना व उतरण्याची लागणारे वळणे, गुंदले येथील अधिकारी पेट्रोल पंप येथील वळण, खुटल येथील वळण तर नव्याने सूर्या नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला दिले गेलेले वळण अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बोईसर - चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाच्यावेळी वळणे काढली जातील,अशी अपेक्षा होती. मात्र ती तशीच ठेवण्यात आली आहेत. एमआयडीसी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या रस्त्यावरुन आता दिवसेंदिवस वर्दळ वाढणार आहे. ही वळणे जीवघेणी ठरण्याची दाट शक्यता आहे.

- संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते