१४ लाख रुपये घेवून बिल्डर फरार,पोलीसांचा तपास सुरु; नालासोपारातील कुटुंब बेघर

वसई : घर देतो असे सांगून आयुष्यभराची पुंजी, १४ लाख रुपये, घेवून पळालेल्या एका बिल्डरच्या वाटेकडे नालासोपारातील मध्यमवर्गीय कुटुंब डोळे लावून बसले असून,पोलीसही गेल्या वर्षभरापासून त्याचा शोध घेत आहेत.

वसई : घर देतो असे सांगून आयुष्यभराची पुंजी, १४ लाख रुपये, घेवून पळालेल्या एका बिल्डरच्या वाटेकडे नालासोपारातील मध्यमवर्गीय कुटुंब डोळे लावून बसले असून,पोलीसही गेल्या वर्षभरापासून त्याचा शोध घेत आहेत.

नालासोपारातील संदिप चौधरी वसईच्या एका कंपनीत काम करीत होते. ही कंपनी हरियाणा येथे गेल्यामुळे चौधरी यांना कंपनीने सन २०१२ ला सेटलमेंटचे १४ लाख रुपये दिले होते. या रकमेतून स्वतःचे घर घेण्याच्या प्रयत्नात असताना चौधरी यांची नालासोपारा एस.टी.डेपोजवळील हरीओम एन्टरप्रायझेस बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्सच्या मनिष मिश्राशी भेट झाली. या मिश्राने ६०० फुटाचा फ्लॅट दाखवून सहा – सात हफ्त्यात २०१३ ते २०१७ या पाच वर्षात चौधरी यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले. त्यानंतर तो फरार झाला. त्याच्यासह त्याचे पाटणकर पार्क येथील कार्यालयही गायब झाले. त्यामुळे आपल्या आयुष्यभराची मिळकत घेवून बिल्डर फरार झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र,तोपर्यंत खुप उशीर झाला होता. मनिष मिश्रा याचे मोबईलही बंद झाले होते

या फसवणूकीमुळे चौधरी कुटुंबावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. राहत्या घराचे भाडे थकले,नोकरी गेली,पत्नी आजारी,मुलाचे शिक्षण रखडले अशा परिस्थितीत ते फरारी बिल्डर परतण्याची वाट पाहत आहेत. पोलीस मिश्राला पकडतील आणि पैसे परत मिळतील या आशेवर ते जगत आहेत. तर पोलीसही मिश्राच्या मागावर असून,त्याचा कसून शोध घेत आहेत.

“मिश्राच्या आमिषाला भुलून मी बळी पडलो,टप्प्याटप्प्याने त्याला १४ लाख रुपये दिले.घर मात्र,मिळालेच नाही.आता सर्व मदार पोलीसांवर आहे.”

-संदिप चौधरी

सदर व्यवहाराला अनेक वर्षे उलटून गेली आहेत.बिल्डर फरार झाल्यावर चौधरी यांनी तक्रार नोंदवली.तरिही आम्ही त्याच्या शोधात आहोत.

-तपासी अंमलदार फडतरे,पोलीस उपनिरिक्षक