परमविर सिंह,प्रदीप शर्मा विरोधात तक्रार करणाऱ्या बिल्डरवर अनधिकृत बांधकामाचा गुन्हा दाखल

२०१७ साली तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनी आपल्या दोन गाड्या बळजबरीने नेल्याची तक्रार विरार मधील बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी केली होती.अंटालिया प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या अकरा गाड्यांमध्ये या दोन गाड्या असण्याची शक्यता व्यक्त करून माझा मनसुख हिरेन होऊ देऊ नका, अशी विनवणी करून संरक्षण देण्याची विनंती ही राऊत यांनी पोलिसांकडे केली होती.

    वसई: परमवीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या विरारमधील बिल्डरवर बनावट बांधकामाद्वारे ९२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. २०१७ साली तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनी आपल्या दोन गाड्या बळजबरीने नेल्याची तक्रार विरार मधील बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी केली होती.अंटालिया प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या अकरा गाड्यांमध्ये या दोन गाड्या असण्याची शक्यता व्यक्त करून माझा मनसुख हिरेन होऊ देऊ नका, अशी विनवणी करून संरक्षण देण्याची विनंती ही राऊत यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार अँटी करप्शन ठाणे यांनी गेल्या सोमवारी मयुरेश राऊत यांचा जबाबही नोंदवला होता.

    त्यानंतर मयुरेश राऊत यांच्यावरच तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांनी प्रतिभा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून नालासोपारा पुर्व तुळींज येथे बनावट बांधकाम परवानगी वापरून चार मजली इमारत उभारली होती.बांधकाम परवानगी खरी असल्याचे भासवून सिडको, महापालिका,सदनिकाधारक आणि दुय्यम निबंधक यांची राऊत यांनी फसवणूक केल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्या आदेशान्वये अतिक्रमण लिपिक अक्षय मोखर यांनी तुळींज पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार राऊत यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम ५२, ५३, ५४ अनुसार तथा भादवि कलम ४६५, ४६७, ४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाव मौजे तुळींज सर्वे क्रमांक १२१ हिस्सा नंबर १ पैकी मध्ये राऊत यांनी ४ मजली प्रभाकर स्मृती ( भवन ) नामक इमारतीचे अनधिकृत बांधकाम करताना बनावट सीसी चा (बांधकाम परवानगी) चा वापर केल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती.त्यामुळे अनधिकृत बांधकाम विभाग प्रमुख विजय पाटील यांनी प्रभाकर भवन सोसायटीकडे बांधकाम परवानगी व त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास पत्र दिले होते.मात्र सोसायटीने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.त्यामुळे पालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रभाकर भवनच्या बांधकाम परवानगीची खातरजमा केली असता,सदर परवानगी बनावट असल्याची माहिती प्रभाग ब ला मिळाली. त्यामुळे सदर सोसायटीला रीतसर नोटीस बजावून विकासक मयुरेश राऊत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.