शिवसेना खासदार राजेंद्र गावितांवर विनयभंगाचा गुन्हा, नेमकं काय घडलं?

खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. तक्रारदार महिला ही गावित यांच्याच एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. या महिलेने राजेंद्र गावितांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप केलाय. गावितांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

शिवसेनेचे नेते आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे सध्या चांगलेच संकटात सापडलेत. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. तक्रारदार महिला ही गावित यांच्याच एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. या महिलेने राजेंद्र गावितांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप केलाय. गावितांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

हे प्रकरण पूर्णतः खोटं असून आपली बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राजेंद्र गावित यांनी केलीय. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा खोट्या केसेस टाकल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र या प्रकरणामुळे राजेंद्र गावितांच्या अडचणीत चांगलीच भर पडणार आहे.

तक्रारदार महिला ही गेल्या १५ वर्षांपासून गावित यांच्या मालकीच्या गॅस एजन्सीत काम करत होती. गेल्या अनेक वर्षांपासून आपला लैंगिक छळ आणि शोषण केलं जात असल्याचा आरोप तिनं केलाय.  २००५ साली गावित एक दिवस अचानक आपल्या घरी आले आणि आपल्यासाठी मोबाईल आणला, असं तिनं सांगितलं. त्यावेळी तो मोबाईल घेण्यास आपण नकार दिला. त्यावेळी आपल्याशी मैत्री केल्यास पैसा, घर आणि इतर सुखसोयी देण्याचं आश्वासन दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्या बदल्यात त्यांनी आपल्याकडं शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

यापूर्वीही आपण तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र राजकीय दबावामुळे आपली तक्रार नोंदवून घेतली गेली नाही, असं या महिलेचं म्हणणं आहे. गावित हे मोठे नेते असल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा या महिलेनं केलाय. त्यामुळं पोलिसांनी आपल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही तिनं केलंय.

राजेंद्र गावित यांनी आपल्याविरुद्ध गुन्हाच दाखल नसल्याचं म्हटलंय. आपल्याविरुद्ध या महिलेनं केवळ एक पत्र दिलं असून या महिलेनं आपल्या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप गावित यांनी केलाय. त्याबाबत आपण स्वतः या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सहा दिवस त्यांनी तुरुंगवासही भोगला. हा आरोप खोटा असल्याचा दावा राजेंद्र गावित यांनी केलाय.