कोरोनामुळे रिक्षाचालकांवर आर्थिक संकट; शासनाकडून मदतीची मागणी

  • रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.मात्र शासनाने घातलेल्या अटी यामुळे अनेकांनी आपल्या रिक्षा बंदच ठेवणे पसंत केले. शेकडो रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बँक लोनवर घेतल्या असून त्यांना सद्य:स्थितीत तरी बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुभा दिली असली तरीही मुदत संपल्यावर थकीत लोनचे हप्ते भरायचे कसे हा पेच आहे.

बोईसर : लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रकारच्या कंपन्या, कारखाने, दुकाने आणि वाहने बंद करण्यात आली होती. परंतु आता लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही आर्थिक संकटात सापडला आहे. रिक्षामध्ये एक चालक आणि दोन प्रवासी अशा प्रकारे परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यांना इंधन खर्च निघण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेदेखील आपल्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे. 

रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.मात्र शासनाने घातलेल्या अटी यामुळे अनेकांनी आपल्या रिक्षा बंदच ठेवणे पसंत केले. शेकडो रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बँक लोनवर घेतल्या असून त्यांना सद्य:स्थितीत तरी बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुभा दिली असली तरीही मुदत संपल्यावर थकीत लोनचे हप्ते भरायचे कसे हा पेच आहे. 

दरम्यान, बोईसर परिसरात सुमारे जवळपास पाच हजार रिक्षा असून कमी प्रवासी असल्यामुळे रिक्षाच्या आधारावर संसाराचा गाडा ओढायचा कसा असा निर्माण झाला आहे. तसेच आपल्या जिवाची पर्वा न करता रिक्षाचालक रोजगारासाठी बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वाहनचालकांना प्रत्येकी पाच हजार रूपये दिल्ली सरकारकडून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सरकारकडून सार्वजनिक वाहनचालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.