कोरोना बाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न;  पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविले

पालघर: जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संखेत वाढ होत आहे. भिवंडी तालुक्यातील एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगड येथील रिवेरा रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार घेत असताना रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमध्ये रुग्णाच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

वाडा येथील हा ४० वर्षीय तरुण कोरोना महामारीने ग्रासला असून तो पोशेरी येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत होता. परंतु एकाएकी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने आणि त्यास त्रास होऊ लागल्याने त्याला अतिदक्षता विभागाची गरज होती. म्हणून त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिवेरा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रविवारी सकाळच्या वेळेस त्यांनी लघुशंकेचे कारण कर्मचाऱ्याला सांगत तो थेट स्वच्छतागृहकडे न जाता रुग्णालयाच्या गच्चीवर गेला. गच्चीवरून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूस उडी मारली. ही बाब तेथे कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला समजताच त्याने ताबडतोब रुग्णालयाच्या डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना सांगितली.

कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारल्याचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या रुग्णाला रुग्णालयात तातडीने आणून उपचार सुरू केले. त्वरित त्या रुग्णांवर उपचार झाल्याने संबंधित रुग्णाची प्रकृती जरी स्थिर असली तरी त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. यामुळे रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी यावेळी दिली.