आदिवासी आश्रमशाळेत ३० विद्यार्थी व एकास शिक्षकाला कोरोनाचा संसर्ग; संक्रमितांमध्ये मुलींची संख्या अधिक

आश्रमशाळेतील २४ मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही बाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

    पालघर: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णसंख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. अश्यातच नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत ३०विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.

    नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर १९३ विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण ३० विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.

    करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील २४ मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही बाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.