महापालिकेच्या बसेस बनल्या मद्यपींचा अड्डा

वसई: लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महापालिकेच्या बसेसमध्ये गर्दुल्ले आणि मद्यपींनी आपला अड्डा बनवला असून फेरीवाल्यांनीही त्यात दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लॉकडाउनमुळे महापालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली आहे .गेल्या पाच महिन्यांपासुन ही सेवा ठेकेदाराने बंद केल्याने १३० बसेस नालासोपारा पुर्व आणि इतरत्र उभ्या करण्यात आल्या आहेत. या बसेसची सुरक्षा करण्यासाठी   सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र गर्दुल्ले,मद्यपी आणि गुन्हेगारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य इथे आहे. या प्रवृत्तीच्या लोकांनी सुरक्षा रक्षकांना धमकावून डेपो आणि आसपाासच्या परिसरात उभ्या असलेल्या बसेसवर कब्जा केल्याचे दिसून येत आहे.या बसेसमध्ये राजरोसपणे गर्दुल्ले आणि मद्यपींनी आपला अड्डा जमवला आहे.त्यामुळे बसगाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

गाड्यांमध्ये मलमुत्र,पान-गुटखा खाऊन टाकलेली पिंक,गुटख्याची पाकिटे आणि दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या बसेसवर फेरीवाल्यांनी कब्जा केला असून,त्यात आपली दुकाने थाटली आहेत. बसेसच्या खिडक्यांचा फेरीवाले शो केस म्हणून वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुर्वेकडील गजबजलेल्या आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिवहन सेवेचा डेपो आहे.सायंकाळी या परिसरात अंधार आणि गुन्हेगारांचे साम्राज्य असते. त्यातच डेपोवर गर्दुल्ल्यांनी ताबा मिळवल्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे जर सेवा परत सुरू केली तर या सर्व बसेसना साफसफाई करण्यातच वेळ जाऊन सेवा उशिरा सुरू होण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे.

परिवहनच्या १३० बसेस ठेकेदाराच्या मालकीच्या आहेत. त्याची काळजी त्यानेच घेतली पाहिजे. ३० बसेस महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्या सुस्थितीत महापालिकेला परत करण्याची जबाबदारी त्याचीच आहे.
                                                                                                          – विश्‍वनाथ तळेकर,परिवहन विभाग प्रमुख

 नालासोपारातील डेपोत बसेस उभ करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात आहेत. मात्र गर्दुल्ले दादागिरी करतात. त्यांची तक्रार करण्यात आली आहे. – मनोहर सकपाळ, महासंचालक, भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनी