Crime

बहुजन विकास आघाडीचे(bahujan vikas aghadi) नेते प्रशांत राऊत(prashant raut) यांनी रहिवाशी सदनिकेचे वाणीज्यिक रुपांतर करुन आपले जनसंपर्क कार्यालय स्थापन केल्याची तक्रार शिवसेनेचे शहर उपप्रमुख विनायक भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.राऊत यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणीही भोसले यांनी केली होती.

  वसई: बहुजन विकास आघाडीचे(Bahujan Vikas Aghadi) माजी सभापती प्रशांत राऊत(prashant raut) यांच्या विरोधात अनधिकृत बांधकामा पाठोपाठ जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  प्रशांत राऊत यांनी रहिवाशी सदनिकेचे वाणीज्यिक रुपांतर करुन आपले जनसंपर्क कार्यालय स्थापन केल्याची तक्रार शिवसेनेचे शहर उपप्रमुख विनायक भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.राऊत यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणीही भोसले यांनी केली होती.या तक्रारीचे निवेदन देताना त्यांच्यासोबत प्रवीण जाधव हे कार्यकर्ते होते.

  आपल्या विरोधात तक्रार केल्याचा राग येवून वचपा काढण्यासाठी अमरनाथ किनळेकर,स्मृती किनळेकर,संजय सावंत आणि ८ जणांनी मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार जाधव यांनी विरार पोलीस ठाण्यात केली होती. प्रशांत राऊत यांची तक्रार करतोस का असे म्हणत त्या ११ जणांनी मारहाण करीत माझा मोबाईल फोडला.गळ्यातील चैन हिसकावून घेतली.त्याचवेळी मनवेलपाडा बीट चौकीचे पोलीसांनी येवून माझा बचाव केला.त्यांच्या समक्षही मारहाण करणार्‍यांनी धमकी दिली,असे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

  हे सोसायटीचे प्रकरण आहे.त्यात माझे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे.पोलीस जबाब घ्यायला बोलावतील त्यावेळी मी माझी बाजू मांडणार आहे.खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची शक्यता मी पोलीसांना दिलेल्या पत्रात या अगोदरच व्यक्त केली होती.

  - प्रशांत राऊत,माजी सभापती

  त्यांच्या तक्रारीनुसार अमरनाथ किनळेकर,स्मृती किनळेकर,संजय सावंत आणि प्रशांत राऊत यांच्यासह सात-आठ जणांवर १०९,३२७,४२७,१४३,१४७,१४९,३२३ कलमांसह अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम ३(१)(आर),३(१)(एस),३(२)(व अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  बोगस कागदपत्रांच्या आधारे इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात प्रशांत राऊत यांच्यासह त्यांच्या भाच्यांवर याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्याच्या पाठोपाठ या महिन्यात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.