mansukh hiren

प्रवीण दरेकर(praveen darekar) आणि देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी मनसुख हिरेन प्रकरणात(mansukh hiren) नाव घेतलेले धनंजय गावडे(dhananjay gawade) हे वसईतील शिवसेनेचे नगरसेवक,जिल्हा उपप्रमुख,स्थायी समिती सदस्य,गटनेते होते.त्यांच्यावर निरनिराळे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

    रविंद्र माने, वसई: मनसुख हिरेन प्रकरणाशी गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे आणि वसईतील धनंजय गावडे यांचा संबंध असून वाझेला तात्काळ अटक करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. यामुळे वसई शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली होती.या प्रकरणी मनसुख धिरेन या व्यावसायिकाला चोकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.त्यामुळे याप्रकरणात गुंतागुत वाढत असताना,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वसईतील गुंड धनंजय गावडे याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी असाच आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

    सतत तीन दिवस मनसुख हिरेन यांना सचिन वाझे चौकशीसाठी गुन्हे शाखेत घेवून जात होते.तु या प्रकरणात अटक हो,दोन दिवसात जामीनावर सोडतो.असे वाझे यांनी हिरेन यांना सांगितले होते.त्यामुळे ते तणावाखाली होते,अशी माहिती त्यांची पत्नी विमला यांनी दिल्याचे फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले.तसेच मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे जवळ होते.त्यानंतर ४० किलोमीटर अंतरावरील खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला.त्यामुळे गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय,त्यांची हत्या गाडीत करून खाडीत टाकण्यात आली असे मुद्दे फडणवीस यांनी उपस्थित केले.त्यामुळे वसईच खळबळ उडाली आहे.

     कोण आहेत गावडे ?

    दरेकर आणि फडणवीस यांनी या प्रकरणात नाव घेतलेले धनंजय गावडे हे वसईतील शिवसेनेचे नगरसेवक,जिल्हा उपप्रमुख,स्थायी समिती सदस्य,गटनेते होते.त्यांच्यावर निरनिराळे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.माहिती अधिकाराखाली त्यांनी अनधिकृत बांधकामांची माहिती घेवून बिल्डरांमध्ये खळबळ उडवून दिली होती. मात्र,त्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गायब झाले होते.

    दरम्यान,जामीनासाठी त्यांनी वर्षाच्या सुरवातीला न्यायालयात दाद मागितली होती.ती फेटाळण्यात आली होती.त्यामुळे त्यांचे वसईतील आगमन लांबणीवर पडले होते.त्यानंतर गावडे यांच्याबाबतीतील चर्चा बंद झाली होती.आता मनसुख हिरेन प्रकरणी दरेकर आणि फडणवीस या दिग्गज नेत्यांनी नाव घेतल्यामुळे गावडे पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत.

    एका बिल्डरकडून ४० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी सन २०१७ ला सचिन वाझे आणि गावडे यांच्या विरोधात एफआयआरही दाखल झाला होता.त्यात या दोघांनी अटकपुर्व जामीन घेतल्याचे फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले होते.मात्र,दरेकर आणि फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचे गावडे यांनी खंडण केले आहे.

    माझा संबंध नाही – गावडे

    गावडे म्हणतात, आश्‍चर्य वाटते की,मनसुख प्रकरणात माझं नाव घेतले जात आहे.या प्रकरणीशी माझा,दुरुन लांबून कोणताही संबंध नाही.देशातील सर्वोच्च यंत्रणा एनआयएस तपास करतेय त्यातून बाहेर येईलच,डेड बॉडीचे लोकेशन वसईत सापडले म्हणून त्याला माझे नाव घेणे,हे कोणत्यातरी बिल्डरला,बिल्डर लॉबीला वाचवण्याचे कारस्थान आहे.

    मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे.माझ्यावरील कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नाही.अशा प्रकारचे बदनामीकारक कोणत्याही पुराव्याशिवाय वृत्त तुम्ही करु नये,पुरावे असतील तपास यंत्रणेला द्या,कोणालाही अशाप्रकारे आयुष्यातून उठवू नका,एका बिल्डरला वाचवण्यासाठी प्रतिष्ठेचा वापर केला जात आहे. कोणत्या बिल्डरला वापरताहेत,काय वापरताहेत हे मी सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे.२०१७ मधील गुन्ह्यात माझे नाव त्यात मी कधी आरोपी नव्हतो.या प्रकरणी तपासी अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारचा माझा संबंध नसल्याचा अहवाल सत्र न्यायालयात दाखल केला आहे.असेही गावडे यांनी स्पष्ट केले आहे.