आश्रमशाळेत कामाच्या गुणवत्तेची तपासणी आयआयटीकडून करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 पालघर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि पालघर अंतर्गत आश्रम शाळेच्या इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासणी आयआयटी मुंबई यांच्याकडून करण्यात यावी असे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले. आश्रमशाळांच्या इमारती संदर्भात आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांनी व्ही.सीद्वारे बैठक आयोजित केली होती.   

या बैठकीत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम  विभाग ठाणे/ पालघर, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जव्हार यांच्याशी आश्रम शाळा इमारत संकुल बांधकामा बाबत मंजूर कामे, सुरू असलेली कामे बंद असलेली कामे, तसेच पूर्ण झालेली कामे, प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च,मंजूर निधी,कामाचा दर्जा आदी कामांचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. 

आश्रमशाळा आणि इमारतीचं बांधकाम जर धीम्या गतीनं होत असेल , इमारती नादुरुस्त असतील, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा नसतील, मुलांना बसण्याची गैरसोय होत असेल तर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय अयोग्य असून लवकरात लकवर या आश्रमशाळा दुरुस्त करण्यात याव्यात असे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.