जागतिक आदिवासी दिनी आरोग्य विषयक उपक्रम राबवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

  • आदिवासी दिनी कोसबाड इथं रान भाज्यांचं प्रदर्शन
  • चालू वर्षी जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना सर्व आदिवासी संघटनांनी आणि बांधवांनी कोरोना विषाणूचा संसर्ग तसचं जिल्ह्यात लागू असलेला जमावबंदीचा आदेश विचारात घेऊन सांस्कृतीक किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करून गर्दी करू नये.

पालघर : ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोव्हिड-१९ विषाणूमुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार १ ते ३१ ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जमावबंदीच्या आदेशानुसार ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येत नाही. तसचं शासन सूचनेनूसार ३१ जुलै च्या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाच्या सांस्कृतिक सभा आणि गर्दी होणारा कार्यक्रम करण्यासाठी निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे चालू वर्षी जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना सर्व आदिवासी संघटनांनी आणि बांधवांनी कोरोना विषाणूचा संसर्ग तसचं जिल्ह्यात लागू असलेला जमावबंदीचा आदेश विचारात घेऊन सांस्कृतीक किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करून गर्दी करू नये. 

या प्रसंगी सर्व आदिवासी संघटनांनी आणि बांधवांनी आरोग्य विषयक कार्यक्रम जसे आरोग्य निदान, आरोग्य तपासणी शिबिरे कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनजागृती करावी.

मात्र सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक आहे. तसचं जिथं जिथं प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेली आहेत. त्यात लागू असलेल्या सर्व निर्बंधांचं पालन नागरिकांनी करणं बंधनकारक आहे. प्रतिबंधित तसचं इतर ठिकाणी ही कोणत्याही स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यास मज्जाव असणार आहे. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करावा असं अवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केलं आहे.

आदिवासी दिनी कोसबाड इथं रान भाज्यांचं प्रदर्शन : 

५ ऑगस्ट ला मुख्यमंत्री उद्‌ध्व ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या कोसबाड इथं ९ ऑगस्ट ला ११ ते १ वाजेपर्यंत रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रानभाज्यांचा परिचय होईल. आणि त्यांचं महत्व नागरिकांना कळेल. त्या माध्यमातून आदिवासी जनतेला रोजगार उपल्बध होऊ शकेल या हेतुनं आदिवासी दिनी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.