VASAI VIRAR MUNICIPAL CORPORATION

वसई-विरार महापालिकेतील(vasai virar corporation) लोकप्रतिनिधींचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपुष्टात आला. धोरणामुळे त्यानंतर या पालिकेत निवडणूक झाली नाही.तेव्हापासून गेले नऊ महिने या पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे.

    रविंद्र माने, वसई: वसई-विरार महापालिका निवडणूक(vasai virar corporation) आणि पालिकेतून वगळण्याबाबतच्या तारखांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ यांचा हिरमोड झाला आहे.

    वसई-विरार महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपुष्टात आला. धोरणामुळे त्यानंतर या पालिकेत निवडणूक झाली नाही.तेव्हापासून गेले नऊ महिने या पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे.

    २०२१ च्या सुरुवातीला लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीला वेग आला होता.इच्छुक उमेदवारांनी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून हळदी-कुंकवाच्या माध्यमातून घराघरात शिरण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी आकर्षक वस्तूंचे वाण देऊन भरघोस पैसाही खर्च केला.दरम्यान निवडणूक आयोगाने मतदार याद्यां अद्यावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या उत्साहात भर पडली.

    पालिका आयुक्तांतर्फे ज्येष्ठ वकील अनील अंतुरकर यांनी याचिका मागे घेतली आहे. तसेच सर्व याचिका डिस्पोज झाल्यामुळे गावांच्या बाजूने निकाल लागेल.

    - वकील जिमी घोन्सालविस

    आपापल्या प्रभागातील मतदार याद्या मागवून त्यावर अभ्यासही करण्यात आला. मात्र त्याचवेळी राज्य शासनाने पालिकेतील प्रशासकांचा कार्यकाल दोन महिन्यांनी वाढवून दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

    प्रशासकांचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे पुढील दोन महिन्यानंतरच निवडणुका होतील हे गृहीत धरून ते निराश झाले आहेत. त्यातच महापालिकेतून गावे वगळण्यासाठीच्या तारखा न्यायालयात लागल्यामुळे सीमेवरील प्रभागातील उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पालिकेतून गावे वगळल्यास आपापले प्रभाग हातचे गमवावे लागतील,अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

    दुसरीकडे महापालिकेतून गावे वगळण्याबाबतची सुनावणी न्यायालयात सुरू झाली. मात्र याप्रकरणी न्यायालयात तारखांवर तारखा पडत चालल्यामुळे ग्रामस्थ निराश होत चालले आहेत.

    मुंबई उच्च न्यायालयात २८ जानेवारीला गावांची सुनावणी होती.त्यानंतर फेब्रुवारी,मार्च अशा तारखांवर तारखा याप्रकरणी पडत गेल्या.४ मार्चला होणारी सुनावणी आता तर तब्बल ३५ दिवसांनी पुढे गेली असून ९ एप्रिलची तारीख पडली आहे. त्यामुळे हमारे गाव मे हमारा राज म्हणणारे ग्रामस्थ निराश होत चालले आहेत. अशाप्रकारे निवडणूक पुढे गेल्याने गावे वगळण्याची प्रक्रिया पुढे जात आहे. पळा पळा कोण पुढे पळे तो अशी जणू स्पर्धाच लागली आहे.