wada nagarpanchayat

वाडा शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे पथदिवे(streetlight issue in wada city) गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

जयेश शेलार, वाडा : वाडा शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे पथदिवे(streetlight issue in wada city) गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान वाडा शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या ई ई एस एल कंपनी व वाडा नगरंचायत यांच्यात बिल देण्यावरून वाद सुरू असून याचा परिणाम शहरातील दिवाबत्ती सेवेवर होत असल्याचे आढळून आले आहे.

या कंपनीकडून पथदिवे लावण्याचे व देखभाल दुरुस्तीचे २० लाखांचे बिल धाडण्यात आले आहे. मात्र पथदिवे सुरू ठेवण्याबाबत व देखभाल दुरुस्तीबाबत सुरळीत सेवा मिळत नसून करारात नमूद केलेल्या काही बाबींची पूर्तता कंपनीकडून झाली नसल्याने करारातील बाबींची पूर्तता करावी, त्यानंतर हे बिल अदा केले जाईल, अशी भूमिका नगर पंचायती कडून घेण्यात आली आहे.

वाडा शहरात एकूण कंपनीसोबत करार करण्याअगोदर एकूण ६३० पथदिवे अस्तित्वात होते. कंपनीसोबत करार झाल्यानंतर ई ई एस एल कंपनीकडून शहरात एकूण ११४२ एल ई डी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यातील २०० च्या वर पथ दिवे बंद आहेत. करारानुसार बंद झालेले पथ दिवे २४ तासाच्या आत बदलणे कंपनीला बंधनकारक आहे, मात्र बंद अवस्थेत असणारे पथ दिवे कंपनीकडून बदलण्यात आलेले नाहीत तर या कंपनीकडून पथ दिव्यांच्या दुरुस्तीसाठी पूर्ण वेळ कर्मचारी नियुक्त केला नसल्याने काही वेळा शहरातील पथ दिवे दिवसाही सुरूच असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दरम्यान पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करार केलेल्या कंपनीकडून सुरळीत सेवा मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर वाडा नगर पंचायतीने ही याबाबत तात्काळ तोडगा काढून शहरातील दिवाबत्ती सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीसाठी एल ई डी पथदिवे बसवून त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ई ई एस एल कंपनीसोबत करार करण्यासंदर्भात ४ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयात  जाहीर केला होता. एस्को तत्वावर हा करार असून यासाठी १४ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील नगरपंचायतींनी ई ई एस एल कंपनीसोबत करार केला आहे.

प्रतिक्रिया

 – शहरातील अनेक पथदिवे बंद असल्याने त्याठिकाणी रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. या अंधाराचा गैरफायदा घेऊन शहरात एखादी अप्रिय घटना घडू शकते. याबाबत तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी.  – विशाल मुकणे, नागरिक – वाडा

– ई ई एस एल कंपनीच्या सेवेमध्ये काही त्रुटी असून बंद पथदिवे बदलणे, देखभाल – दुरुस्तीसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमणे व स्विच तयार करणे यांसह करारातील अन्य बाबींची पूर्तता केल्यानंतर बिल अदा केले जाईल. – गीतांजली कोळेकर, नगराध्यक्ष, वाडा नगरपंचायत

– या कंपनीला शहरातील रस्त्यांवर एल ई डी पथदिवे बसवण्याचा करार आहे त्यामुळे वीज बिलात कपात होईल, ही अपेक्षा होती, मात्र कंपनीच्या सदोष सेवेमुळे दिवसभर दिवे सुरू असल्याने बिलात कपात होण्याऐवजी वाढ होत आहे. – मनीष देहेरकर, गट नेते भाजप, वाडा नगर पंचायत

-सेवेतील त्रुटीबाबत ई ई एस एल कंपनीशी पत्रव्यवहार केला असून रजेवर असलेले मुख्याधिकारी आल्यानंतर बिला संदर्भात निर्णय घेतला जाईल. – विवेक घायवट प्रशासकीय अधिकारी वाडा नगरंचायत

– कंपनीकडून वाडा शहरात नव्याने पथ दिवे बसविण्यात आले असून त्याचे एका वर्षाचे बिल देण्यात आले आहे, मात्र ती रक्कम अजून मिळाली नाही. हे बिल मिळताच उर्वरित काम केले जाईल.- पंकज खताल, प्रकल्प अधिकारी, ई ई एस एल कंपनी