ship wreck

लाखो वसईकरांचा(Vasai) जगाशी संपर्क तुटला होता. तब्बल ६५ तासांनी बुधवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजूनही अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.

    रविंद्र माने, वसई : तौक्ते चक्रीवादळाच्या(Tauktae Cyclone) तडाख्यामुळे वीज नाही. पाणी नाही. इन्व्हर्टर,मोबाईल, इंटरनेट बंद अशा अवस्थेत लाखो वसईकरांचा जगाशी संपर्क तुटला होता. तब्बल ६५ तासांनी बुधवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजूनही अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.

    तौक्ते चक्रीवादळाने गुजरातकडे जाता जाता महाराष्ट्राला चांगलाच तडाखा दिला.त्यात समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या वसई-विरार तालुक्याची मोठी हानी झाली. तालुक्यातील माड,आंबे,पेरू,पिंपळ,भेंडी,चिंच अशी शेकडो झाडे वादळाच्या तडाख्याने वीज वाहक तारांवर कोसळून पडली.रविवारी मध्यरात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस,ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात उत्तर वसई आणि आसपासची गावे,शहरे अंधारात बुडाली.

    लोंगर लागलेली केळीची हजारो झाडे आणि आंब्याची झाडे आडवी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक इमारतींच्या टेरेस,घरांची छते, गुरांच्या गोठे,बैठ्या चाळी वरील पत्रे उडून गेले.वीज वाहक तारा आणि अनेक खांब कोसळून पडले. परिणामी वसईतील नवघर, विशाल नगर,आनंद नगर,कृष्णा टाऊनशिप,मेरिविला,कौल सिटी,चुळणे,नवपाडा, वाळसई,सांडोर,रमेदी, किल्ला,प्रभू आळी,पापडी,कराडी मर्सेस,नालासोपारातील नगिनदास पाडा निळेगाव, श्रीप्रस्थ,साई नगर,हनुमान नगर,समेळ पाडा,सोपारा, उमराळे,नाळे,वाघोली,गास,आचोळे,संयुक्त नगर,गाला नगर,नगिनदास पाडा विरार मधील सत्पाळा,आगाशी अर्नाळा अशी अनेक गावे परिसर अंधारात बुडाले.वीज नसल्याने या सर्व परिसरातील पाणी पुरवठाही खंडित झाला.सोसायटीत आणि दारात विहीर असूनही विजे अभावी पाणी घेता आले नाही.

    खाजगी प्लांट बंद पडल्यामुळे शहरातील लोकांची मिनरल वॉटरसाठी धावाधाव झाली.एरवी ३० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मोठ्या बाटल्या जादा पैसे देऊनही मिळेनाशा झाल्या. दुर्लक्षित आणि नामशेष होऊ पाहणाऱ्या मेणबत्त्या ही शोधून सापडल्या नाहीत.

    वसईच्या मर्सेस गावातील परिस्थितीही विदारक आहे.विजेचे पंधरा खांब आणि झाडे कोसळून तीन दिवस उलटले असतानाही कोणतेही अधिकारी या परिसरात न फिरकल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तासाला तीन हजार या दरानुसार येथील ग्रामस्थांनी जनरेटर मागवला होता.या तासाभरात प्यायला पाणी आणि संपर्कासाठी मोबाईल चार्ज करून घेण्यात आला.
    वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे इन्व्हर्टर बंद, इंटरनेट बंद, मोबाइल बंद अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो तरुणांना नोकरी टिकवण्याची तीन दिवस धडपड करावी लागली.

    विजेचे १४ ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने पालघर महावितरण विभागात एकूण ९३ वीज वाहिन्या मध्ये तांत्रिक बिघाड होऊन १ लाख ९८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.झाडे वीज वाहिन्या वर पडून लघु दाब वाहिनीचे ४९ पोल, उच्च दाब वहिनीचे १९ पोल आणि एका रोहित्र केंद्राचे नुकसान झाले.वीजपुरवठा खंडित झालेल्या ९३ वीजवाहिन्यांपैकी ५५ वीजवाहिन्याचा वीजपुरवठा बुधवारी रात्री सुरळीत झाला. उर्वरित ३८ विजवाहिन्याचा व १२ उपकेंद्राचा वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम सुरू असल्यामुळे अजूनही अनेक गावे अंधारात आहेत.

    वादळात तिघांचा मृत्यू
    या तौक्ते वादळाने वसईत तिघांचा बळी घेतला. सातिवली येथील लाईट बुक कंपनीच्या छतावर ताडपत्री टाकण्यासाठी चढलेल्या विजय कुमार यादव या तीस वर्षीय तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला.तर कुर्ला येथून सातिवली सागर प्लाझा इंडस्ट्रीत आलेल्या बैतुल्लाह अन्सारी यांचा रिक्षावर झाड पडल्यामुळे मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत महावितरणचे कर्मचारी मनोहर पवार कर्तव्यावर असताना मयत झाले.देव तलाव येथील वीजवाहक तारांच्या खांबावर चढून ते दुरुस्तीचे काम करत होते.त्यावेळी वरून पडल्यानेत्यांचा मृत्यू झाला.

    मच्छिमार बोटींचे नुकसान
    वादळी वाऱ्यामुळे किनार्‍यावर असलेल्या बोटी आपटून फुटल्या आहेत. त्यामुळे अर्नाळातील भोलाशंकर (नाखवा सुरेश पांडुली ),धनवान (रमेश जांगुल,चतुर नाखवा) आणि मोशे (जॅानसन डेडु ) या तीन बोटींचे १००% तर दिगंबर(गजानन बोरीखालचा) यांचे ६०% नुकसान झाले आहे.