पालघर जिल्ह्यात लसीकरणावर भर; १०१२२९ व्यक्तींना कोविड लसीचा लाभ

या लसीकरण मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २१४९८ आरोग्य कर्मचारी, १३७५१ पहिल्या फळीतील कामकरणारे कर्मचारी, ४५ ते ६० वयोगटातील १०२६१ व्यक्तींनी तर ३८३४० ज्येष्ठ नागरिक व व्याधीयुक्त असलेल्या व्यक्तींसह ८३८५० जणांना प्रथम डोस देण्यात आला असून १७३७९ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे.

    पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करून घेण्यावर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुरुवातीपासून ८३८५० आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी व जेष्ठ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून त्यापैकी १७३७९ कर्मचारी व जेष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर जिल्ह्यामध्ये ३ हजार ३१८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    या लसीकरण मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २१४९८ आरोग्य कर्मचारी, १३७५१ पहिल्या फळीतील कामकरणारे कर्मचारी, ४५ ते ६० वयोगटातील १०२६१ व्यक्तींनी तर ३८३४० ज्येष्ठ नागरिक व व्याधीयुक्त असलेल्या व्यक्तींसह ८३८५० जणांना प्रथम डोस देण्यात आला असून १७३७९ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे अशा एकूण जिल्ह्यामध्ये १०१२२९ व्यक्तींना कोविड-१९ ची लस देण्यात आली आहे.

    पालघर जिल्ह्यात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात लसीकरण केंद्राची संख्या ६१ असून पालघर ग्रामीण येथे ३२ शासकीय लसीकरण केंद्र तर ५ खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र आहेत. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये १४ शासकीय तर १० खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

    ०१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यामध्ये ३३१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर या कालावधीमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.