vikramgad rice experiment

विक्रमगड हा तालुका भातशेतीसाठी(rice farming) प्रसिद्ध आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा, संकरीत भाताच्या बियाणांच्या(rice crops seeds) वाढलेल्या किंमती, खतांचा तुटवडा व खर्च यामुळे शेतकऱ्याला भातशेती नकोशी झाली आहे. या परिस्थितीतही शेतीत नवनवीन प्रयोग करून ती टिकविण्याचा अनोखा प्रयत्न काशिवली (निंबळेपाडा) गावातील अंकुश भोये(ankush bhoye) यांनी केला आहे. भोये यांनी तब्बल ५५ जातींच्या भाताच्या वाणाची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली असून त्यांना भाताच्या वाणाची बँक(seeds bank) तयार करायची आहे.

अमोल सांबरे, विक्रमगड : विक्रमगड हा तालुका भातशेतीसाठी(rice farming) प्रसिद्ध आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा, संकरीत भाताच्या बियाणांच्या(rice crops seeds) वाढलेल्या किंमती, खतांचा तुटवडा व खर्च यामुळे शेतकऱ्याला भातशेती नकोशी झाली आहे. या परिस्थितीतही शेतीत नवनवीन प्रयोग करून ती टिकविण्याचा अनोखा प्रयत्न काशिवली (निंबळेपाडा) गावातील अंकुश भोये(ankush bhoye) यांनी केला आहे. भोये यांनी तब्बल ५५ जातींच्या भाताच्या वाणाची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली असून त्यांना भाताच्या वाणाची बँक(seeds bank) तयार करायची आहे.

संकरीत बियाणे व खतांचा भडिमार यामुळे तांदुळाचा रुचकरपणा हरवला असून शेतीदेखील नापीक होत चालली आहे. विक्रमगड तालुक्यातील काशिवली गावातील अंकुश भोये यांनी मात्र भात शेतीत उल्लेखनीय कार्य करून भातशेतीला अधिक मजबूत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. अंकुश हे मागील ४ वर्षांपासून सेंद्रिय शेती करत असून इस्कॉन या संस्थेशी त्यांची ओळख झाली. यातून संस्थेने त्यांना आपल्या शेतात विविध जातींचे बियाणे तयार करण्यास सुचविले ज्यासाठी बियाणांची उपलब्धता देखील करून दिली.

कसबइ, पाचएकी, झिनी, वाडा कोलम, मसाला जव्हार, अश्विनी जव्हार, काल कुडई, डुनडुन डहाणू, डांगी, कर्जत, तोरण्या, गावरान बासमती, नजर भात, पालघर ३ अशा तब्बल ५५ प्रकारचे भात भोये यांनी आपल्या एक एकर शेतीत प्रायोगिक तत्वावर लावले. जपानी पद्धतीने लावलेल्या व अवघ्या १०० ग्रॅम वजनाची भात पेरणी केले असता आता यातून ५ ते १० किलो भात बियाणे तयार झाले आहे. पुढील वर्षी अजून मोठ्या पद्धतीने लागवड करून पारंपरिक भात बियाणांची एक मोठी सीड बँक त्यांना तयार करायची आहे.

अंकुश हे अतिशय प्रयोगशील शेतकरी असून ते दरवर्षी भाजीपाला लागवड करतात. ज्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर देखील करतात. पण खत व घातक कीटकनाशकांऐवजी ते सेंद्रिय शेतीचा अवलंब करतात. जी भविष्यात शेतीत क्रांती घडवून आणणारी बाब आहे. अंकुश यांनी सेंद्रिय शेती बचतगट नावाने समूह शेती करून भाताची सिड्स बँक तयार केली असून यात त्यांना मधुकर निमला, परशुराम तरे, प्रकाश निमला, सदानंद टोकरे, हरेश तुंबडा आदी शेतकरी सहकार्य करीत आहेत.

दरवर्षी ६ हजार रुपयांचे बिन भरवश्याचे बियाणे व १० हजार रुपयांचे खत लागत असे. मात्र मी केलेल्या सेंद्रिय शेतीने खतांचा खर्च वाचला असून शेतीचे होणारे नुकसानही टाळता आले आहे. भाताच्या दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या जाती आम्ही संवर्धन व साठवण करणार असून याचा नक्कीच लाभ अनेक शेतकऱ्यांना होईल. तसेच अनेक नामशेष होत चालेल्या बियाण्याचे संवर्धन होईल.

- अंकुश भोये, प्रयोगशील शेतकरी