palghar hospital

पालघर जिल्ह्यातील(palghar district) अनेक आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट(fire audit) तसेच इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट(electrical and structural audit झाले नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. हे ऑडिट न केल्यामुळे भविष्यात भंडारा(bhandara)सदृश्य स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन पाटील, पालघर: भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील(civil hospital) नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडल्यानंतर राज्य शासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असले तरी पालघर जिल्ह्यातील(palghar district) अनेक आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट(fire audit) तसेच इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. हे ऑडिट न केल्यामुळे भविष्यात भंडारासदृश्य स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात बहुतांश बाळंतपण डहाणू कासा व जव्हार रुग्णालयात होत आहेत. यामध्ये डहाणू व कासा रुग्णालयांमध्ये नवजात शिशु देखभाल केंद्र नसले तरी जव्हार तालुक्यातील पतंग शाह कुटीर रुग्णालयात हे केंद्र कार्यरत आहे. ग्रामीण भागासाठी येथील प्रसुती विभाग वरदान ठरत आहे. महिन्याकाठी याठिकाणी ४० ते ५० प्रसूती होत आहेत. या पार्श्वभूमीवर या आरोग्य संस्थेतही फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. एका खासगी संस्थेकडून एप्रिलमध्ये जव्हार रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले होते. मात्र ही संस्था खासगी असल्याने हे ऑडिट गृहीत धरले जात नाही असे असले तरी जव्हार रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा कार्यरत आहे. याच बरोबरीने या रुग्णालयांमध्ये फायर अलार्म यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या रुग्णालयांमध्ये शासनमान्य सुरक्षा यंत्रणेमार्फत ऑडिट तात्काळ करून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत पालघर जिल्ह्यात एकूण बारा रुग्णालये कार्यरत आहेत. या बाराही रुग्णालयात प्रसूती विभाग असले तरी या रुग्णालयांचे फायर स्ट्रक्चरल व इलेक्ट्रिकल ऑडिट आजवर झालेले नाही,ही बाब गंभीर आहे. एखाद्या ठिकाणी अशा रुग्णालयांमध्ये गंभीर घटना समोर आल्यानंतर प्रशासन जागे होऊन अशा ऑडिटसाठी धावपळ करण्याऐवजी सतर्कता म्हणून आधीच रुग्णालयांची ऑडिट करून ठेवणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. भंडार्‍याच्या धरतीवर आता तरी पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा फायर ऑडिट साठी सजग राहून तात्काळ आरोग्य संस्थांचे फायर इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चर ऑडिट करतील का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या रुग्णालयांमधून प्रसुती झालेल्या माता व बालकेच नव्हे तर येथे उपचार घेत असलेले व दाखल असलेल्या रुग्णांच्या जीवनाचाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक रूग्णालयाच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. काही रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यातच या सर्व रुग्णालयांमध्ये रूग्णालय स्थापन झाले त्यावेळी वायरिंग, इलेक्ट्रिक  तत्सम कामे झालेली आहेत. या इलेक्ट्रिक कामांना अनेक वर्ष झाल्याने वायरिंग व इलेक्ट्रिक उपकरणे धोकादायक स्थितीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच बरोबर या रुग्णालयांमध्ये होणारा वीज पुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्यामुळे रुग्णालयांमधील उपकरणांमध्ये स्फोट घडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांनी रुग्णांच्या जीवाचे महत्त्व लक्षात घेत तिन्ही प्रकारचे ऑडिट करून घेण्याची मागणी समोर येत आहे.

पालघर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे तिन्ही प्रकारचे ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. येत्या चार दिवसांमध्ये हे ऑडिट पूर्ण होऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात येईल.

- डॉ. अनिल थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक,पालघर

गेल्या अनेक वर्षांपासून पालघर शहरात असलेले जे जे युनिटचे माता व बालसंगोपन केंद्र या भागात गरोदर मातांसाठी वरदान आहे. दिवसाकाठी तीन ते चार प्रसूती या केंद्रात होत आहेत. मात्र ही इमारत जीर्ण झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ही इमारत वापरता येणार नाही किंवा ती वापरा योग्य नाही असे अभिप्राय देऊन ही इमारत धोकादायक असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर अनेक महिने उलटले तरी या इमारतीची डागडुजी करण्या ऐवजी आजही याच इमारतीत प्रसूती केल्या जात आहेत. त्यामुळे येथे येत असलेल्या गरोदर, स्तनदा माता, बालके व या इमारत परिसरात राहात असलेले आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याठिकाणी अघटित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.