Former Tribal Development Minister Vishnu Savara cremated

मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा अनंतात विलीन झाले. बुधवारी सायंकाळी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी वाड्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र डॉ. हेमंत सवारा यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यासह खासदार कपिल पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, रवींद्र चव्हाण, जगन्नाथ पाटील, आमदार सुनील भुसारा राजेश पाटील, श्रीनिवास वनगा यांच्यासह विविध मान्यवरांनी अत्यदर्शन घेतले. त्यांच्या निवासस्थाना पासून निघालेल्या अंत्ययात्रेत सावरांचे चाहते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

सावरांच्या निधनामुळे संपूर्ण वाडा शहरातील बाजरपेठ बंद ठेवण्यात आली होती.  सलग ६ वेळा आमदार असणारे सवरा दोन वेळा कॅबिनेट दर्जाचे आदिवासी विकास मंत्रीपद भूषवले. गेल्या अडीच वर्षापासून ते आजारी होते. त्यांच्यावर सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर यकृत रोपण आणि हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना १८ नोव्हेंबर पासून  मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरु असताना बुधवारी रात्री ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे.