four wheeler market vasai

नालासोपारातील(nalasopara four wheeler market on street) मुख्य रस्त्यावर चारचाकी विक्रीचा खुलेआम बाजार भरत आहे. त्यामुळे वाहतुकीला,पादचार्‍यांना अडथळा निर्माण होत आहे. पालिका,पोलीस आणि वाहतूक शाखेने मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रविंद्र माने, वसई: नालासोपारातील(nalasopara four wheeler market on street) मुख्य रस्त्यावर चारचाकी विक्रीचा खुलेआम बाजार भरत आहे. त्यामुळे वाहतुकीला,पादचार्‍यांना अडथळा निर्माण होत आहे. पालिका,पोलीस आणि वाहतूक शाखेने मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नालासोपारा पश्‍चिम उड्डाणपूल ते समेळपाडा नाल्यापर्यंतच्या सहा पदरी रस्त्यावर जुन्या दुचाकी विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ‘फॉर सेल’ अशा पाट्या लावलेल्या या गाड्या पाहण्यासाठी अनेक दलाल,खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात. रस्त्यावरच या गाड्यांचा सौदा होतो.त्यानंतर रस्त्यालगतच्या फुटपाथ पलिकडील गॅरेजमध्ये व्यवहार पूर्ण केला जातो. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरील बाजाराला गाड्या पार्क करून ठेवण्यासाठी फुकटची जागा मिळते.त्या दिसण्यासाठी रस्त्यावरील पालिकेचे हायमॅक्स दिवेही दिमतीला असतात. त्यामुळे या जागेसाठी मालमत्ता कर,जागेचे भाडे अथवा वीजबीलही भरावे लागत नाही.

सहापदरी रस्ता तयार झाल्यापासून हा बाजार पालिका प्रशासन,पोलीस आणि वाहतूक पोलीसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम भरत आहे.विशेष म्हणजे या बाजारासमोर हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शाळेच्या बस,टेम्पो,रिक्षा आणि इतर गाड्या पार्क करून ठेवलेल्या असतात. उर्वरीत जागा फेरीवाले आणि गॅरेजवाल्यांनी काबीज केलेली असते. हे कमी की काय म्हणून येथील स्पेअरपार्ट विकणार्‍या दुकानदारांनी आपपाले जाहीरातीचे स्टॅन्डी भर रस्त्यात उभे केले आहेत. त्यामुळे पादचार्‍यांना मुख्य रस्त्यावरून वाहने चुकवत मार्गक्रमण करावे लागत आहे.

नोटीसा पाठवून लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

- महेश पाटील,अतिक्रमण विभाग प्रमुख

दरम्यान,रस्त्यावरील पार्क केलेल्या गाड्या हटवण्याचे आदेश महापालिकेने वाहनांच्या मालकांना दिले होते.पंधरा दिवसांत ही वाहने न हटवल्यास ती जप्त करण्यात येतील आणि दररोज २०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येईल अशा नोटीसा वजावण्यात आल्या होत्या.तरीही रस्त्यावर गाड्या राजरोसपणे उभ्या करून ठेवण्यात येत आहेत.पोलीस,वाहतूक शाखा आणि पालिका प्रशासनाशी लागेबांधे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

मी सध्या सुट्टीवर आहे. पण कारवाई करण्यासाठी आमच्या पथकाला पाठवण्यात येईल.

-विलास सुपे, वाहतूक पोलीस निरिक्षक