गडचिंचले साधू हत्याकांड -लॉकडाऊनमध्येच घडली होती देशाला हादरवणारी घटना

पालघर(palghar sadhu murder) जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेले कासा गडचिंचले(gadchinchale) येथे घडलेल्या साधू हत्याकांडाचे प्रकरण(mob lynching) संपूर्ण भारतभर चर्चिले गेले होते. या हत्याकांडात महंत सुशील गिरी महाराज, चिकणे महाराज व त्यांचा कार चालक निलेश तेलगडे यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती.

    संतोष चुरी,पालघर : लॉकडाऊनमध्ये(lockdown) १६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेले कासा गडचिंचले येथे घडलेल्या साधू हत्याकांडाचे प्रकरण संपूर्ण भारतभर चर्चिले गेले होते. या हत्याकांडात महंत सुशील गिरी महाराज, चिकणे महाराज व त्यांचा कार चालक निलेश तेलगडे यांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याचे तीव्र पडसाद भारतभर उमटले होते.

    हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आत्तापर्यंत या प्रकरणात ४०५ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने यापैकी १७५ जणांची जामीनावर सुटका केली. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेल्यानंतर १२६ जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पुढे पोलिसांनी या प्रकरणात ७५ जणांना अटक केली व त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात सुरुवातीला ५० आरोपींना जामीन देण्यात आला. त्यानंतर २८ लोकांच्या विरोधात पुरावे नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतरच्या सुनावणीत ७५ जणांना जामीन अर्ज मान्य करण्यात आला व त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर २२ जणांची जामीनावर सुटका करण्यात आली.

    या प्रकरणाचा फटका पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना बसला व अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी केली. गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत दोन आरोपपत्र न्यायालयात दाखल केली आहेत. या साधू हत्याकांडाचा तपास पोलिसांनी पक्षपातीपणे केल्याचा आरोप पंच दशमान जुना आखाडा व मृत्युमुखी पडलेल्या साधूंच्या नातेवाईकांनी केला आहे. तशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली असून या हत्याकांडाचा तपास एनआयएकडे द्यावा,  अशी मागणी केली आहे.दरम्यान या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती अशोक भूषण व आर. एस.रेड्डी यांच्या खंडपीठाने पुरवणी आरोपपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

    गडचिंचले साधू हत्याकांडाच्या आरोपीवर ठाणे सेशन कोर्टात २२३ जणांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्याची सुनावणी लवकरच सुरू होणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.