एकच फाईट अन् वातावरण टाईट : वसईतील हॉटेल चालकांचा सरकारला सवाल; आयपीएल ऑन,शुटींग ऑन, हमने क्या गुनाह किया डॉन ?

राज्यात रस्त्यावर फळ-भाज्या विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.हार्डवेअर,स्टेशनरी,मोबाईलची दुकाने सुरु आहेत.रेल्वे तुडुंब भरून धावतेय,बसेस भरुन जातात. या सेवा सॅनिटाईज केल्या जात नाहीत. तरीही त्या सुरू आहेत.

    वसई : आयपीएल ऑन, फिल्म शुटींग ऑन फिर हमने क्या गुनाह किया डॉन असा सवाल उपस्थित करून वसईतील हॉटेल उद्योजकांनी आपापल्या हॉटेलसमोर काळे कपडे घालून तीव्र आंदोलन केले.

    राज्यात रस्त्यावर फळ-भाज्या विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.हार्डवेअर,स्टेशनरी,मोबाईलची दुकाने सुरु आहेत.रेल्वे तुडुंब भरून धावतेय,बसेस भरुन जातात. या सेवा सॅनिटाईज केल्या जात नाहीत. तरीही त्या सुरू आहेत. त्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तेथून कोरोनाचा प्रसार होत नाही. हॉटेलमधून कोरोना पसरतो असा समज करून सरकारने सर्वात जास्त महसूल देणार्‍या हॉटेल इंडस्ट्रीजवर कडक निर्बंध घातलेत.

    शुक्रवार ते रविवार या विकेंन्डला सर्वात जास्त व्यवसाय हॉटेल इंडस्ट्रीजचा होतो. या दिवसांत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते ते ही मान्य केले. मात्र,त्यानंतर सोमवारी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच हॉटेल सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे आमचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षी ९ महिने हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे कर्मचारी गावी गेले होते.त्यांना कसेबसे परत बोलवून धंदा सुरु केला तर सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावले. त्यामुळे लोकांना खाऊ घालणारे आम्ही आज उपाशी झोपणार आहोत. अशी खंत व्यक्त करून वसईतील हॉटेल व्यवसायिकांनी आपापल्या हॉटेलसमोर काळे कपडे घालून मूक आंदोलन केले.

    स्टाफ,वेंडर्स कामगार गावी चाललेत त्यांना पुन्हा बोलवून धंदा सुरु करणे खूपच अवघड जाणार आहे. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी वॅक्सिन,निरनिराळे उपचार आहेत पण उपासमारीवर कोणताच उपाय नाही. हॉटेल इंडस्ट्रीज सुरु ठेवणे हा त्यावर उपाय आहे.

    हॉटेल फार्म हाऊसचे मालक

    सरकारला सर्वात जास्त महसूल आमच्या हॉटेल इंडस्ट्रीजकडून जातो. तरीही आमच्यावर अन्याय केला जातो. हे आम्हाला मान्य नाही. सरकारने सांगितले फक्त ५० टक्के ग्राहक घ्या आम्ही घेतले. कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी केली जाते. हॉटेल सॅनिटाईज केले जातात.तरीही आमच्यावर निर्बंध लादण्यात आले. मात्र, रेल्वे,बस वाहतूक सॅनिटाईज केली जात नाही. त्या सर्रास सुरू आहेत. आम्हाला दिलेली सकाळी ७ ते रात्री ८ ही वेळ बदलून सकाळी ११ ते रात्री १२ करावी.

    प्रकाश हेगडे,अध्यक्ष वसई हॉटेल असोशिएशन