राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला : संजय राठोड

    वसई : माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतरही विरोधी पक्ष राज्य सरकारवर प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर सचिन वाझे प्रकरणात विरोधी पक्षांकडून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याचं पार्श्वभूमीवर माजी मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    दरम्यांन राठोड म्हणाले की, राज्याच्या घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हे खूप दुर्दैवी आहे. पण अशा संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रातील माझा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यातून मला पुन्हा लढण्याची जिद्द मिळाली आहे. त्यामुळे मंत्री असताना माझा समाज मला भेटत होता. आता मी समाजाच्या दारादारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे, असं राठोडांनी सांगितलं आहे.

    समाज बांधणीसाठी राठोडांचा वसई दौरा

    वन मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी समाज बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वसई येथून केली. वसईच्या देवीपाडा तांड्यावर जाऊन त्यांनी समाजाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार होते.

    यावेळी संजय राठोड यांनी सांगितले की, वसईला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतील समाज या परिसरात वसलेला आहे. वसई हे मुंबई जवळचे ठिकाण आहे. त्यासाठी वसईत मी दौऱ्याची सुरुवात करण्याचे ठरवले. तसेचं, आमचा बंजारा समाजाचा नागरिक हा वीटभट्टी, मोलमजुरीचे काम करणारा आहे. अशा काळात त्यांना मदत आणि धीर देण्याची गरज आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोना महामारीत माझा बंजारा समाजाच्या वेदना, समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रत्येक संकटात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे, असंही माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले.