वसई विरार मध्ये कोरोनाचे वाढते आकडे; भाजपला आंदोलन पडले महागात

  • १४ पदाधिकार्‍यांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

वसई : परिवहन सेवेसाठी केलेले आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडले असून, याप्रकरणी १४ पदाधिकार्‍यांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेची परिवहन सेवा सुरू करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या भाजपने सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयाजवळ आंदोलन केले होते . मात्र, या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टनसिंग न ठेवले गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग न ठेवताच आंदोलन करणार्‍या भाजपच्या १४ पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्त्यांवर विरार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.जिल्हाध्यक्ष राजन नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, नारायण मांजरेकर, उत्तम कुमार इत्यादी पदाधिकार्‍यांचा त्यात समावेश आहे.

जगभरात कोरोना थैमान घातल्यामुळे सोशल डिस्टंसिंग ठेवणे, मोर्चे, सभा, घोषणाबाजी करण्यास मनाई आदेश बजावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तसेच फर्मान काढले होते.मात्र त्यांच्याच पक्षाने वसईत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत शेकडोंच्या संख्येने आंदोलने सुरू केली आहेत. ४ सप्टेंबरला वीज मंडळा विरोधात भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात बहुसंख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोविडमुळे भाजपाच्या आंदोलनाला पोलिसांकडून मनाई करण्यात आलेली असतानाही २८ तारखेला परिवहन सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. या सर्वांवर विरार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका महिन्यात भाजपाने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत केलेल्या आंदोलनामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे देशात त्यांची सत्ता आहे .केंद्र सरकारने केलेले नियम वसईतील त्यांचाच पक्ष पायदळी तुडवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान,वसई-विरार मधील रुग्णसंख्येने २२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आतापर्यंत आता पर्यंत कोरोनामुळे ४३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक नालासोपाऱ्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक १७८ आहे. तर विरारमध्ये ११७ , वसईत १२४, नायगावमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्यामध्ये गंभीर आजार आणि ५० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. रुग्ण संख्या वाढत असतानाही गांधी जयंती दिनी अर्नाळा,वसई, नवघर-माणिकपुर, नालासोपारा याठिकाणी काँग्रेस आणि मी वसईकर अभियानाकडून आंदोलन होणार आहेत.

आम्ही या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. मात्र परिवहन हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे या भेटीचे आंदोलनात रूपांतर होऊन नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.- राजन नाईक, जिल्हाध्यक्ष भाजप.