माहिती दडवणाऱ्या २ शासकीय अधिकाऱ्यांवर माहिती आयुक्तांची कारवाई

वसई: माहिती दडवणाऱ्या परिवहन आणि महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांना कोकण विभागीय माहिती आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची शास्ती सुनावली आहे. नालासोपारातील आरटीआय कार्यकर्ते सुरेश चौघुले यांनी वसई-विरार महापालिकेच्या(vasai virar corporation) प्रभाग बमध्ये येणाऱ्या विविध कामांची माहिती २८ जुन २०१६ ला मागवली होती. जनमाहिती अधिकारी दिलीप लोखंडे यांनी ती मुदतीत दिली नाही. त्यामुळे चौघुले यांनी याप्रकरणी जनमाहिती अधिकार्‍यांकडे प्रथम आणि द्वितीय अपील केले होते. त्यावेळी कोकण विभागीय माहिती आयुक्तांनी  बजावलेल्या नोटीसीला लोखंडे यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही.त्‍यामुळे झालेल्या सुनावणीत लोखंडे यांना दोषी ठरवून कोकण विभागीय माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी पाच हजाराची शास्ती सुनावली आहे.

सुरेश चौघुले यांनी २७ एप्रिल २०१८ ला सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांकडे एका माहितीचा अहवाल(information report) मागवला होता.अवजड वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना वेग नियंत्रण बसवण्यात आल्याचे निरीक्षण केल्याबाबतचा अहवाल त्यांनी माहिती अधिकारात मागितला होता. ही माहिती जन माहिती अधिकारी एन.एन. पाटील यांनी त्यांना मुदत दिली नाही. त्यानंतर चौघुले यांनी केलेल्या अपिलात पाटील यांनी चुकीची माहिती दिली. तसेच माहिती हवी असल्यास प्रती पृष्ठ ५० रुपये याप्रमाणे ३०६ पानांचे पंधरा हजार तीनशे रुपये भरण्यास चौघुले यांना सांगण्यात आले.

प्रति पृष्ठ २ रुपये आकारण्यात येत असताना पन्नास रुपये कसे मागण्यात आले ,याबाबतचे स्पष्टीकरणही पाटील यांनी दिले नाही. त्या मुळे झालेल्या सुनावणीत पाटील यांना पाच हजार रुपयांची शास्ती सुनावण्यात आली आहे. ही शास्ती दोन मासिक हप्त्यात त्यांच्या वेतनातून वसुल करण्यात येणार आहे.

या दोन्ही निकालाची प्रत १२ सप्टेंबर २०२० ला मिळाली आहे .अशा निकालामुळे शासकीय अधिकारी ताळ्यावर येतील.
                                                                                                               – सुरेश चौघुले, आरटीआय कार्यकर्ता