जैमुनी पतसंस्था घोटाळा आंदोलनाच्या बाबतीत पोलिसांचे वरातीमागून घोडे

वसई : जैमुनी(jaymuni) पतसंस्था घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या चार आंदोलनानंतर पाचव्या आंदोलनाला नालासोपारा पोलिसांनी मनाई आदेश बनवल्यामुळे पोलिसांचे वरातीमागून घोडे धावल्याचे चर्चा केली जात आहे.

नालासोपारातील जैमुनी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे २०१६ मध्ये उघड झाले होते. या पतसंस्थेत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्याची कमाई गुंतवली होती. तर गरीब शेतकरी आणि गृहिणींनी आपल्या उतारवयातील औषधोपचारांसाठी मुलींच्या लग्नासाठी ठेवी ठेवल्या होत्या. गाळा खरेदी प्रकरणात या पतसंस्थेत ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्यामुळे सर्व ठेवीदार आणि खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

समाजातील काही लोकांनी हा घोटाळा करून पतसंस्था मोडीत काढल्याचे समजल्यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.गेल्या चार वर्षात खातेदारांना पैसे परत मिळाले नसल्याने त्यातील अनेकांनी अंथरूण धरले आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी आणि खातेदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी काही लोकांनी एकत्र येऊन जैमुनी बचाव कृती समिती सुरू केली.

या समितीमार्फत गेले चार शनिवार -रविवार संध्याकाळी घोटाळ्यातील सूत्रधारा विरोधात घोषणाबाजी करून वाघोलीत मोर्चा,धरणे,तिरडी आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रसारित झाले होते.तरीही कोरोनाच्या संसर्ग काळात सोशल डिस्टंसिंग चे नियम न पाळता करण्यात आलेल्या या आंदोलनाची पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे रविवारी पाचव्या आंदोलनाची तयारी करण्यात आली होती.

या आंदोलनाला मात्र पोलिसांनी मनाई आदेश बजावला आहे. या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भावही वाढेल असे कारण नमूद करून नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी आंदोलकांना नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा मनाई आदेश कोरोनाच्या काळात जाहीर केला असून त्याचा भंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा गोसावी यांनी दिलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग न पाळणारी मागील पाच आंदोलने दुर्लक्षीत करून पाचव्या आंदोलनापूर्वी नालासोपारा पोलिसांनी बजावलेली ही नोटीस म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची या अनुषंगाने चर्चा केली जात आहे.

मागील आंदोलनाची माहिती मिळाली म्हणूनच मनाई आदेशाची नोटीस बजावण्यात आली आहे.
                                                                     – श्रीरंग गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

पोलिसांनी मनाई आदेशाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र पैसे वसुलीची प्रक्रिया सुरूच राहील.  – जैमुनि बचाव कृती समिती