जळितग्रस्तांच्या मदतीला धावली जिजाऊ, रोख मदतीनंतर घर-दुकानही बांधणार

मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथे होळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास अनंता बाळू मौळे यांच्या राहत्या घराला व दुकानाला आग लागली. त्या घटनेत त्यांच्या परिवारातील त्यांची आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका अनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे-वय १५ वर्ष,मुलगा कृष्णा अनंता मौळे वय-१० वर्ष यांचा या दुर्देवी घटनेत आगीमध्ये होळपळून मृत्यू झाला.

    विक्रमगड : मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथील अनंता मौळेंनी आगीत सर्वच गमावलं. राहतं घर. उपजीविकेचे साधन असणारे दुकान. घरातील जीवलगही. आई,पत्नी,दोन मुलंही. त्यांच्या सोबत उरलीत दोन मुले. मृत्यूशी झुंज देणारी. जेव्हा सर्वस्व हरवल्यावर सोबत कुणीच नव्हतं, तेव्हा त्यांच्या मदतीला धावली जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटना. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे मौळेंवरील आपत्तीचं कळताच ते स्वत: तेथे पोहचले. तात्काळ मदत तर केलीच पण जिजाऊतर्फे घर-दुकान बांधून देण्याची जबाबदारीही घेतली. अनंता मौळेंचं सारं जीवनच राख झालं असं वाटत असतानाच पुन्हा जगण्याचा आधार मिळाला.

    मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथे होळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास अनंता बाळू मौळे यांच्या राहत्या घराला व दुकानाला आग लागली. त्या घटनेत त्यांच्या परिवारातील त्यांची आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका अनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे-वय १५ वर्ष,मुलगा कृष्णा अनंता मौळे वय-१० वर्ष यांचा या दुर्देवी घटनेत आगीमध्ये होळपळून मृत्यू झाला. त्यांची मुलगी अश्विनी अनंता मौळे वय १७ वर्ष, मुलगा भावेश अनंता मौळे वय-१२ वर्ष यांच्यावर नाशिक येथे उपचार चालू आहेत.

    अनंता बाळू मौळे हे ब्राम्हणपाडा येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित सीबीएसई शाळेच्या समितीचे अध्यक्ष व ब्राम्हणपाडा जिजाऊ शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल कळताच जिजाऊच्या निलेश सांबरे यांनी त्वरित हालचाल केली. जिजाऊ तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला. तातडीची मदत म्हणून रोख दोन लाख देण्यात आले. जळून खाक झालेले दुकान व घर १७ एप्रिलपर्यंत पूर्णपणे नवीन बांधून देण्याचाही शब्द दिला.

    श्रीमंतांसारखंच चांगलं दर्जेदार शिक्षण गरीबांनाही मिळालंच पाहिजे या शिक्षण प्रसार धोरणातून ब्राह्मणपाड्यात सीबीएससी शाळा आहे. सर्वांना मोफत शिक्षण देणाऱ्या शाळेच्याच समितीचे अनंता मौळे कार्यरत असतात. त्यांना जिजाऊने केलेल्या मदतीबद्दल सभोतालच्या गावांमध्येही प्रशंसा करण्यात येत आहे.