प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पालघर जिल्हा(palghar) मुख्यालयाच्या विविध इमारतीत जम्बो कोव्हीड केअर सेंटर(Covid Care Center) उभारून त्यात आरोग्य सुविधा निर्माण करून जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सहाही आमदार व खासदारांनी केली होती.

    संतोष चुरी, पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी रुग्णालये व त्यातील खाटा उपलब्ध होत नसल्याने पालघरजवळील कोळगाव येथे बांधून तयार झालेल्या जिल्हा मुख्यालयाच्या विविध इमारतीत जम्बो कोविड केअर सेंटर उभारून त्यात आरोग्य सुविधा निर्माण करून जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सहाही आमदार व खासदारांनी केली होती. या मागणीला पालकमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. तसेच आवश्यक असलेल्या बाबींचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात जवळपास दोन हजार खाटा ऑक्सिजन सुविधेसह उपलब्ध होणार आहेत.

    पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णासंख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोरोना रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू,व्हेंटिलेटर यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध होत नाहीत. रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत.यामुळे नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात जावे लागत आहे.रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे.

    या पार्श्वभूमीवर कोळगाव येथील जिल्हा मुख्यालयाच्या बांधून तयार असलेल्या इमारतींमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर तयार करण्याची मागणी जिल्ह्यातील जेष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर, सुनील भुसारा, क्षितिज ठाकूर, विनोद निकोले, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा या सहा आमदारासह खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ,उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ,पालकमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांच्याकडे केली मागील आठवड्यात लेखी पत्र लिहून केली होती.

    राज्याचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेल्या आठवड्यात सहा आमदार व एक खासदार यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नवीन विविध इमारतींमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ, माणिक गुरसळ,जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले आदी जिल्ह्यातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

    जिल्ह्याची रुग्णवाढ लक्षात घेता रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.पालघर जिल्ह्यासाठी पालघर शहरापासून जवळ असलेल्या कोळगाव येथे भव्य जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले आहे.या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसह विविध इमारतीमध्ये पुरेशा जागेची व्यवस्था उपलब्ध आहे.

    जिल्ह्याच्या जनसेवेसाठी उभारण्यात आलेले मुख्यालय या कोरोनाकाळात कोरोना उपचार केंद्र (जम्बो सेंटर) उभारणे शक्य आहे. तशा सुविधाही तेथे तात्काळ उपलब्ध करून देणे शक्य आहे. जिल्हा मुख्यालयात करोना उपचार केंद्र स्थापन केल्यास सध्यस्थितीत रुग्णांची होणारी वणवण थांबेल व त्यांना दिलासा मिळेल. जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, अशी मागणी पत्राद्वारे सगळ्यांनी सरकारला निदर्शनास आणून दिले होते.

    या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध इमारतींपैकी इमारतीची कोणतीही तोडफोड न करता जितक्या इमारती आहेत त्या इमारतीमधील विविध सभागृह बांधण्यात आली आहेत. त्या सभागृहामध्ये दोन हजार बेड बसू शकणार असल्याने त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह टॉयलेट बाथरूम, पिण्याचे पाणी व रुग्णासाठी वापरण्यास लागणारे पाण्याची सुविधा आहेत कमी पडतील म्हणून तातडीने आणखी टॉयलेट व बाथरूमची कामे व बेडची उपलब्धता ही कामे देखील लागलीच सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले असल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी या बैठकीनंतर सांगितले.

    पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पाहणी करून माहिती घ्यायचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून ऑक्सिजन व इतर सुविधांची तयारी झाल्यास कोविड केअर सेंटर सुरू करू शकतो, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.

    - खासदार राजेंद्र गावित, पालघर लोकसभा

    पालघर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची जास्त गरज आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी इमारत तयार आहे. सुसज्ज इमारतीमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली तर वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची जी हेळसांड सुरू आहे ती बंद होऊ शकते. त्यामुळे त्या कार्यालयात लवकरात लवकर कोविड केअर सेंटर सुरू करावे त्याचप्रमाणे टीमा व आरती ड्रग या कंपनीने शासनास ३ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या निधीतून पालघर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारावा.

    - राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा

    १ मे ला या विषयावर पालकमंत्र्यांन बरोबर सकारात्मक चर्चा झाली. ऑक्सिजनचा साठा आपल्या जिल्ह्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर नवीन जिल्हा कार्यालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात येईल.तसेच लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल.

    - श्रीनिवास वनगा, आमदार,पालघर विधानसभा

    दोन हजार बेडच्या कोविड केअर सेंटरसाठी रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड,आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका आदी सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले.