kasa civil hospital

दोन कोटी रुपये खर्च करून कासा येथे उपजिल्हा रुग्णालय(kasa civil hospital) उभारण्यात आले. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे.

जितेंद्र पाटील, डहाणू: दोन कोटी रुपये खर्च करून कासा येथे उपजिल्हा रुग्णालय(kasa civil hospital) उभारण्यात आले. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. वापी, सेलवास,वलसाड,ठाणे,मुंबई येथे जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये हा उद्देश ठेवून शासनाने सन २००५ मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत प्रशस्त इमारत उभारण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आली. रुग्णांसाठी अद्ययावत यंत्र सामग्री दिली. पण हे सर्व मृगजळच ठरले.

अनेक वर्षांपासून येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे येथे मंजूर आहेत. यापैकी ४ हजर आहेत. इतर ३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिका ३, औषध निर्माता १, कनिष्ठ लिपिक-१,ही पदे रिक्त आहेत. कक्ष सेवक ३, बाह्य रुग्ण सेवक ३, सफाईगार ३ ही पदे कंत्राटी पदावर भरती केलेली आहेत. . उप जिल्हा रुग्णालय सुरू झालेपासून वरिष्ठ लिपिक येथील कार्यालयाला मिळालेला नाही हे विशेष. या उप जिल्हा रुग्णालयात एकूण ४६ पदांना मंजुरी आहे. यापैकी १० पदे रिक्त आहेत. या उप जिल्हा रुग्णालयात , हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, भूलतज्ज्ञ, ही पदे रिक्त आहेत.

हे रुग्णालय ५० बेडचे आहे. मात्र येथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे उप जिल्हा रुग्णालय ओपीडीवर चालले आहे. येथे सोनोग्राफी करण्याची यंत्रणा आहे परंतु ती देखील बंद आहे. शिवाय बालकांना ठेवण्यासाठी जी काचेची पेटी असती ती देखील बंदच आहे. मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी येथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.काही वेळा बाहेरील व्यक्ती बोलावून शवविच्छेदन करावे लागते याचा भुर्दंड मयताच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. येथे तीन रुग्णवाहिका आहेत. पण सध्या स्थितीत एकच रुग्णवाहिका सुरु आहे तर रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने ती गॅरेज ला उभी आहे. त्या रुग्णवाहिकेचे नियोजन करणारा कर्मचारी अधिकृत रुग्णवाहिका एकच असल्यामुळे रूग्णना बाहेरील खासगी गाडीला रुग्ण घेऊन पाठवले जाते ही भयंकर घटना आहे. उप जिल्हा रुग्णालयाचा पदभार वैद्यकीय अधीक्षक पद आजवर रिक्त आहेत.

सर्जन आणि हृदयरोग तज्ज्ञ यांची कमतरता असल्यामुळे अचानक कधी मोठा अपघात झालं तर एक ते दोन डॉक्टर असल्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडते. अशा वेळी गंभीर रुग्णांना बाहेरचे हॉस्पिटल रेफर केले जाते.

पूर्वीपासून आसपासच्या खेड्यातील लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी ५० बेडचे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय आहे. त्यात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन गृह आहे. याशिवाय अनेक वर्षांपासून येथील क्ष किरण गृह सुरु आहे.

कासा हे डहाणू तालुक्यात केंद्रस्थानी असलेले गाव आहे. हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. यामुळे या ठिकाणी रूग्णालयात बाळंतपण करून घेण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे भौतिकदृष्टया सुसज्ज असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. रुग्णालयात प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. मात्र विविध आजारांची चाचणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय कीट नसल्याने रक्ताच्या चाचण्या करण्यावर निर्बंध येत आहेत. या ठिकाणी डॉ प्रदीप धोडी यांच्याकडे रुग्णालयाचा चार्ज आहे. शिवाय वैद्यकीय अधिकारी यांचे एक पद रिक्त आहे. चार डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाची बाजू मांडताना डॉ.धोडी यांनी सांगितले की, रुग्णालयात दररोज ६० च्या जवळपास ओपीडी असते. आम्ही या ठिकाणी २४ तास सेवा देतो. यामुळे सकाळी९ ते दुपारी १ आणि ४ ते ५ वाजेपर्यंत ओपीडी पाहतो.

वैद्यकीय अधीक्षक पद हे अनेक वर्षापासून रिकामे असून सर्जन आणि हृदयरोग तज्ञ ही महत्त्वाची पदे सुधारित आहेत. ती लवकरच भरण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आणखी काही काम करत असतील त्याची माहिती घेऊन लवकरच उपाय योजना केली जाईल.

- डॉक्टर अनिल थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक पालघर

साथजन्य आजारांचा उद्रेक झाल्यास सर्व औषधे पुरेशा प्रमाणात आहेत.सर्प, श्वान दंश औषधांचा पुरेसा साठा आहे. असे असतांना रिकामे असणारे रुग्णालय बरेचसे प्रश्न उपस्थित करत असून त्यांची दाखल आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना सरकारी वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा. या ठिकाणी सध्या एकच रूग्णवाहिका आहेत. या ठिकाणी रोज ३५ ते ४० ओपीडी संख्या आहे़. बुधवारी मात्र ८०च्या घरात ओपीडीची संख्या असते.

कासा उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील पंचक्रोशीत मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे अनेक आजूबाजूचे गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. इथे आल्यानंतर डॉक्टरांच्या कमतरतेमुळे त्यांना उपचारासाठी मुंबई, ठाणे, सिल्वासा अशा बाहेरगावी जावे लागते. या उपजिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर उपलब्ध असावेत सर्व सुविधा रुग्णांना मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.

- सुनील मोरे, ग्रामपंचायत सदस्य कासा