tarapur fort

पुरातन खाते व जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे तारापूरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता लग्न समारंभाचे आयोजन केले जात आहे. तसेच त्यामध्ये दारुच्या पार्टीचे आयोजन केले जात आहे.

  डहाणू: पोर्तुगीजांनी १५ व्या शतकात बांधलेला आणि मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या पालघर येथील तारापूर किल्ला खूप प्रसिद्ध आहे. मात्र पुरातन खाते व जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ऐतिहासिक किल्ल्यावर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता लग्न समारंभाचे आयोजन केले जात आहे. तसेच त्यामध्ये दारुच्या पार्टीचे आयोजन केले जात आहे. ऐतिहासिक ठिकाणी अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा(crime) दाखल करण्याची मागणी तारापूरवासियांनी केली आहे.

  सध्याच्या काळात कोरोना नियमाचे कडक निर्बंध लागू असून देखील या ऐतिहासिक किल्ल्यावर लग्न समारंभासाठी ५०० ते २००० नागरिक जमा होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

  काही दिवसांपासून ऐतिहासिक किल्ल्याच्या पावित्र्याचे भान न ठेवता लग्न समारंभाचे आयोजन करत असलेल्या मालकांना या पावित्र्याचे भान राहिले नसल्याने आता ऐतिहासिक किल्ला प्रशासनाने आपल्या ताब्यात घेऊन त्याचे पावित्र्य राखावे,अशी मागणी तारापूर स्थानिकांनी केले आहे.

  तारापूर खाडीच्या दक्षिण तीरावर असणाऱ्या तारापूर किल्ल्याची उभारणी १५९३ मध्ये पोर्तुगीजांनी केली,असा शिलालेख किल्ल्यात आहे. १७३९ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने या किल्ल्यावर हल्ला केला होता.या हल्ल्यात बाजी भिवराव रेठरेकर नावाच्या मराठा सैनिकाला वीरमरण आले होते. ऐतिहासिक किल्ल्यातील साडेपाच एकर जागा मात्र एका कुटुंबाच्या नावावर आहे.किल्ल्यातील अनेक ठिकाणी मोडतोड करण्यात आली,त्यामुळे अनेक पुरातन वस्तू नामशेष झाल्याचा आरोप तारापूर येथील ग्रामस्थांनी केला आहे.

  संबंधित सरकारी कार्यालयाची योग्य परवानगी न घेता जर कोणी ऐतिहासिक किल्ल्यावर लग्न समारंभ व इतर कार्यक्रम करत असतील तर त्या प्रकरणाची योग्य चौकशी करून कडक कारवाई केली जाईल.

  - किरण महाजन, उपजिल्हाधिकारी, पालघर

  पोर्तुगीज काळात या किल्ल्याचा व्यापारासाठी मोठा फायदा होत होता.समुद्रालगत किल्ला असल्याने याच किल्ल्यातून सागवान लाकुड, तांदूळ यांचा गलबतांमार्फत समुद्री व्यापार केला जात असे.

  दोन दिवसांपूर्वी तारापूर किल्ल्यावर एका लग्नसमारंभाच्या हळदी कार्यक्रमामध्ये किल्याच्या पावित्राचे भान न ठेवता दारुचा साठा ठेवण्यात आला होता. यावेळी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले असून या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा जेने करून परत असे गंभीर कृत्य कोणी करणार नाही.

  - राकेश सावे, तारापूर

  तारापूर येथील व्यापारामुळे या ठिकाणी अनेक गुजराती, मारवाडी, मुसलमान व्यापारी आर्थिक उलाढालीसाठी येत असत. काही कालावधीनंतर ते याच ठिकाणी वास्तव्य करून राहिले, त्यामुळे आजही येथे तारापूर गावात अनेक पुरातन वास्तू आहेत.येणाऱ्या पिढीला इतिहास कळावा म्हणून हा किल्ला महत्त्वाचा असल्याने हा किल्ला पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन पर्यटकांसाठी खुला केला आहे.

  एका बाजूला इतिहास जिवंत रहावा म्हणून स्मारक बांधली जात असली तरी दुसऱ्या बाजूला इतिहासातील गड किल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावर खासगी मालक कब्जा करताना दिसतात.