electricity pole in 5 feet water

कंत्राटदाराचे कामगार आणि स्थानिकांच्या मदतीतून तब्बल ५ फूट पाण्यात विजेचे खांब उभे करण्याची किमया महावितरणने (mahavitran) साधली.

    वसई: तौक्ते चक्रीवादळाने(Cyclone Tauktae) बाधित झालेला नालासोपारा (Nalasopara) पूर्व उपविभागातील वैतरणा भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ५ फूट खोल पाण्यात विजेचे खांब उभारून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

    कंत्राटदाराचे कामगार आणि स्थानिकांच्या मदतीतून तब्बल ५ फूट पाण्यात विजेचे खांब उभे करण्याची किमया महावितरणने साधली. अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत दुरुस्तीचे काम करून २६७५ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून उर्वरित १२५ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    चक्रीवादळामुळे वैतरणा परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या शिरगाव फिडरवरील उच्चदाबाचे ३२ तर लघुदाबाचे ४० खांब पडले किंवा वाकले. परिणामी ३७ रोहित्र बाधित होऊन २८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास दहा वीजखांब पडलेल्या सखल भागात किमान पाच फूट पाणी साचले.

    याठिकाणी खांब उभा करणे अशक्यच होते. पण स्थानिकांच्या मदतीने प्राप्त परिस्थितीवर मात करून विजेचे खांब उभारणे शक्य झाले. पाच फूट पाणी थांबलेल्या ठिकाणी खांब उभारताना पाण्याच्या पिंपाची ऊर्ध्व व अधर बाजू कापून आत पाणी येणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक खोली करून जवळपास सहा खांब रोवण्यात आले. तर जिथे खांब रोवणे शक्य नाही अशा ठिकाणी १० मिलिमीटरची केबल टाकून शक्य असलेल्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

    चक्रीवादळानंतर बाधित १३ उच्चदाब वाहिनीचे खांब, लघुदाब वाहिनीचे २० खांब नव्याने उभारण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत २६७५ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून उद्या सकाळपर्यंत उर्वरित १२५ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.