divyang help from arriage expenditure

लग्नाच्या खर्चाच्या परंपरेला फाटा देत पालघर तालुक्यातील मनोर तामसइ येथील आदेश पाटील यांनी चांगली प्रथा आपल्या लग्नात सुरू केली. लग्नात पैशाची उधळपट्टी न करता हा पैसा दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी (ट्राय सायकल) भेट देण्यासाठी वापरला.

संतोष चुरी, पालघर: लग्न समारंभ सांगितला की भरमसाठ खर्च आला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रिवाजाप्रमाणे खर्चही तितकाच पालघर -ठाणे जिल्ह्यात लग्ना अगोदरच्या हळदीचा कार्यक्रम म्हणजे मित्र नातेवाईकांचा राबता व जेवणावळी वर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च. पण या परंपरेला फाटा देत पालघर तालुक्यातील मनोर तामसइ येथील आदेश पाटील यांनी चांगली प्रथा आपल्या लग्नात सुरू केली.(marriage money used for divyang) लग्नात पैशाची उधळपट्टी न करता हा पैसा दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी (ट्राय सायकल) भेट देण्यासाठी वापरला.

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लग्नानिमित्त ही भेट देण्याचे पाटील यांनी ठरवले व कुटुंबाच्या संमतीने प्रत्यक्षात उतरवले आहे. पालघर येथील माध्यमिक पतपेढी सभागृहात पार पडलेल्या त्याच्या लग्नदिवशी त्याने पाच दिव्यांगांना मदत केल्याचा आनंद असल्याचे आदेश म्हणतो. त्याच्या या कार्यामुळे इतरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. आदेश याने आपला विवाह थाटामाटाने न करता साध्या पद्धतीने कमी जणांच्या उपस्थितीत केला आहे.

पालघर, ठाणे, जिल्ह्यात विवाहावर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहाच्या आदल्या दिवशी हळद व मांडव प्रथा असून या दिवशी शेकडो किलो चिकन, मटन, पंचपक्वान्ने जेवणावळींबरोबरच मंडप, बँडबाजा यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्याचप्रमाणे सध्या एका रात्रीचे हजारो रुपये घेणाऱ्या व कर्कश आवाजाच्या डीजेचीही सोय असते. त्यामुळे या समारंभावर अनाठायी खर्च केला जातो. त्यामुळे असा खर्च वाया न घालवता आदेशने अपंगांना केलेली मदत ही वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले जाते.त्याच्या या चांगल्या कार्यामुळे विविध स्तरातून कौतुक होत आहे.