vasai builder mehta

मूळ अभियंत्याच्या(Fake Name) पदवीवर स्वतःचे नाव टाकून बोरीवलीतील सनद मेहताने वसई विरार महापालिकेत ११ वर्षे कारभार केल्याचे उघड झाले असून, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वसईतील सुनील मुळ्ये या कार्यकर्त्यांनी केली आहे.

  रविंद्र माने, वसई : पेशवाईमध्ये ‘ध’ चा ‘मा’ केल्याची घटना प्रसिद्ध आहे. मात्र वसईमध्ये ‘रा’ चा ‘ता’ करून मूळ अभियंत्याच्या(Fake Name) पदवीवर स्वतःचे नाव टाकून बोरीवलीतील सनद मेहताने वसई विरार महापालिकेत ११ वर्षे कारभार केल्याचे उघड झाले असून, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वसईतील सुनील मुळ्ये या कार्यकर्त्यांनी केली आहे.

  मुख्य अभियंता म्हणून वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात सनद मेहता गेली कित्येक वर्ष कार्यरत आहेत.मेहता यांनी तयार केलेल्या प्लानला तात्काळ मंजुरी मिळत असल्यामुळे तालुक्यातील शेकडो बिल्डरने त्यांच्याशी संधान बांधले होते.तालुक्यातील बहु मजली इमारतींना मेहता यांनी प्लान मंजूर करून दिले होते.मात्र मेहता हे अधिकृत अभियंते नसून त्यांनी नावात साम्य असलेल्या हरियाणा येथील एका अभियंत्याच्या पदवीचा वापर करून स्वतःची बोगस पदवी तयार केल्याचे उघड झाले आहे.

  अभियंत्याचे लायसन्स नूतनीकरण करताना सनद मेहता यांनी सनद मेहरा नावाचे लायसन्स सादर केले.त्यावर पालिकेकडून विचारणा करण्यात आल्यावर टंकलेखनाच्या चुकीमुळे मेहताचे मेहरा झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

  या प्रकरणी पालिकेमार्फत चौकशी समिती नेमण्यात आली असून पालिकेमार्फत योग्य ती कारवाई सुरू आहे.

  - वाय एस आर रेड्डी,उपसंचालक नगर रचना विभाग,वसई-विरार महापालिका

  याप्रकरणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुळये यांनी कागदपत्रे गोळा केली असता, हरियाणा येथील सनद मेहरा या ७५ वर्षीय अभियंत्याच्या पदवीचा वापर करूनच स्वतः अभियंता असल्याची पदवी सनद मेहता यांनी तयार केल्याचे उघड झाले.हरयाणातील सनद मेहरा यांच्या पदवीवर मेहेरा आडनावातील शेवटच्या रा ऐवजी ता असून आपणच तो पदवीधर असल्याचे सणात मेहताने बसवले होते. मात्र ही पदवी मिळवताना संबंधिताचे वय ३० वर्षावरील असणे आवश्यक असताना मेहता यांना ही पदवी एकोणिसाव्या वर्षीच मिळाली होती.तसेच मूळ पदवीधर मेहरा हे ७५ वर्षाचे असल्याचे उघड झाल्यामुळे मेहता यांचे बिंग फुटले.

  पालिकेच्या गोटात शिरकाव करून अनेक मोठी कंत्राटं पदरात पाडून घेत अनेक बांधकाम व्यवसायिकांचे ऊखळ पांढरे करणार्‍या सनद मेहतावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची शांतता होणार नाही. अशा पद्धतीने शासनाची फसवणूक करणार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे तरच कायद्याचा धाक महाठगांमध्ये जागृत होऊन अशा गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.

  - सुनील मुळये, तक्रारदार

  या बोगस अभियंत्यावर महापालिका आयुक्त गंगाथरण डी. यांनी बडतर्फीची कारवाई केली असली तरी, गेली अकरा वर्षे महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही.त्यामुळे त्याचे अभियंता पद रद्द करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी मुळये यांनी केली आहे.

  सनद मेहता याने वसई-विरार महापालिकेत सन ६ डिसेंबर २०१० साली अभियंता परवाना मिळण्याबाबत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग (कलकत्ता) यांच्याकडील सिनीअर टेक्निशियन (एसटी ९६२) कॉर्पोरट मेंबरशीप (एम ५७५८९-५) या प्रमाणपत्रासोबत अर्ज सादर केला होता.याच परवान्याची महापालिकेने शहानिशा न करता सनद मेहताला पालिकेच्या अभियंता पदावर रूजू केले होते.ही संधी साधून सनद मेहताने बोगस अभियंता प्रमाणपत्रावर अनेक महत्वाची कंत्राटं पदरात पाडून घेतली.सनद मेहताचे बिंग फुटल्यावर पालिकेत आणखी कोणी असे बोगस अभियंता ठाण मांडून बसलेत का याचा शोध पालिकेकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीकडून सुरू आहे.