रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेकांच्या घरांना तडे

पालघर : मागील दीड वर्षां पेक्षा ही जास्त काळापासून पालघर(palghar) जिल्ह्यात (district) भूकंपाच्या (earthquake) धक्क्यांचं सत्र सुरूच असून शुक्रवारी एकापाठोपाठ एक असे तीन धक्के बसल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. मध्यरात्री ११ वाजून ४१ मिनिटांनी बसलेला धक्का हा ४.० रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. हा आतापर्यंत बसलेल्या हादऱ्यांपेक्षा सर्वाधिक मोठा हादरा होता. डहाणू तालुक्यातल्या चिंचले, धानीवरी, उर्से, कासा या भागात या भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली असून या भूकंपामुळे जिल्ह्यातला ५० किलोमीटरचा परिसर हादरला आहे.

वारंवार बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे हजारो घरांना तडे गेले असून चिंचले इथल्या दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या हादऱ्यांमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून दिली जाणारी नुकसान भरपाई ही नाममात्र असल्यानं स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही नुकसान भरपाई अधिक मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.