मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी जागा निश्चित

वसई: तेरा जुनी आणि ७ नव्या पोलीस ठाण्यांच्या समावेश असलेल्या नव्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा कारभार लवकरच सुरु होणार आहे. या आयुक्तालयासाठी मीरा रोड येथील जागाही निश्चित करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचा बाज जावून नुकतेच मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची घोषणा करण्यात आली.या आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून मराठमोळे आयपीएस सदानंद दाते कारभार सांभाळणार आहेत.मीरा-भाईंदरमधील ७ आणि वसई-विरारमधील १३ अशी २० पोलीस ठाणी त्यांच्या अखत्यारीत येणार आहेत. सध्या मीरा-भाईंदरमध्ये मीरारोड, भाईंदर, काशिमीरा, उत्तन, नवघर,नयानगर तर वसई-विरारमध्ये अर्नाळा, विरार, तुळींज, नालासोपारा, वसई, माणिकपुर, वालीव अशी पोलीस ठाणी आहेत. त्यात काशिगांव, खारीगांव, नायगांव, बोळींज, मांडवी, पेल्हार आणि आचोळे अशा नव्या पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे.

नव्या पोलीस आयुक्तालयात मीरारोड,वसई आणि विरार अशी ३ परिंमंडळे (झोन) असणार आहेत. तसेच पोलीस उपआयुक्त मुख्यालय आणि विशेष शाखा आणि पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अशी स्वतंत्र कक्षे असणार आहेत.मीरारोड झोन अंतर्गत मीरारोड,भाईंदर आणि प्रस्तावित असलेल्या नवघर सहाय्यक पोलीस आयुक्त असतील.तर वसई झोनमध्ये वसई,नालासोपारा विरार झोनमध्ये विरार आणि तुळींज सहाय्यक पोलीस आयुक्त असणार आहेत.तर पोलीस उपायुक्त विशेष शाखेत विशेष शाखा,नियंत्रण कक्ष आणि वाहतुक सहाय्यक पोलीस आयुक्त असतील,गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे,शोध व प्रतिबंध विभाग सहाय्यक आयुक्त काम करतील.

सहाय्यक पोलीस आयुक्त मीरारोड यांच्या खाली काशीमीरा,मीरारोड आणि प्रस्तावित काशिगांव, भाईंदर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या खाली भाईंदर आणि उत्तन,नवघर सहाय्यक पोलीस आयुक्तांखाली नवघर, नयानगर, खारीगांव, सहाय्य पोलीस आयुक्त वसई यांच्या खाली वसई, माणिकपुर,नायंगाव, सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांच्या खाली नालासोपारा,अर्नाळा आणि बोळींज, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार यांच्या खाली विरार,मांडवी पेल्हार तर तुळींज सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या खाली तुळींज,वालीव,आचोळे ही पोलीस ठाणी कार्यरत राहतील. पोलीस उपमहानिरिक्षकांचा दर्जा असलेले सदानंद दाते १९९० च्या बॅचचे आयपीेएस अधिकारी आहेत. मुबंईत गुन्हे अन्वेषण शाखा आणि कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरीक्त पोलीस कमीश्‍नर म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.