नोकरदारांसाठी लोकल सुरु करण्याची आमदार क्षितीज ठाकूर यांची मागणी

वसई : सरकारने टाळेबंदी उठवण्यास सुरुवात केली असताना आता नोकरदारांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचा विचार करून उपनगरीय लोकल सेवाही सुरू कराव्यात, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर(mla kshitij thakur) यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
लोकल(local) बंद असल्यामुळे वसई-विरार-पालघर परिसरातून लाखो नोकरदारांना दररोज मुंबईत कामावर जाण्यासाठी प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार ठाकूर यांनी ही मागणी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उपनगरीय लोकल बंद केल्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोजक्या लोकलगाड्या सोडण्याची परवानगी दिली आहे. पण गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सामान्य प्रवाशांसाठी लोकल गाड्या बंदच आहेत.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था(transport system) मुख्यत्त्वे लोकल गाड्यांवर अवलंबून आहे. या गाड्या बंद असल्याने सामान्यांना वाहतुकीचे इतर पर्याय चाचपडावे लागतात. त्यातच टाळेबंदी अंशत: शिथील केल्यानंतर अनेक कार्यालयांनी आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली आहे. यापैकी अनेक जण नालासोपारा, वसई, विरार, डहाणू, पालघर या पट्ट्यातील आहेत. लोकल बंद असल्याने दर दिवशी कार्यालय गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.

टाळेबंदीमुळे आधीच अर्थव्यवस्थेचं गाडं रूतून बसलं आहे. त्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यात आता दर दिवशी कार्यालयात रस्तेमार्गाने जाण्यासाठी प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनसेवेवर अवलंबून राहावं लागतं. रस्त्यात असलेली वाहतूक कोंडी, खराब रस्ते, लोकल सेवेच्या तुलनेत जास्त असलेले प्रवासभाडे, प्रवासाला लागणारा वेळ अशा अनेक गोष्टींमुळे नोकरदार आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित आहेत, असे आमदार क्षितीज ठाकूर यांनी पत्राद्वारे रेल्वेमंत्र्यांना कळवले आहे.

दर दिवशी नोकरदाराला प्रवासासाठी २०० ते २५० रुपये बसभाड्यापोटी द्यावे लागत आहेत. त्याशिवाय दर दिवशी त्यांना ८ ते दहा तास प्रवासात घालवावे लागतात. त्यांचा बहुतांश वेळ एक तर प्रवासात किंवा कार्यालयात जात आहे. घरच्यांबरोबर खूप कमी वेळ मिळत असल्याने त्यांच्यावर मानसिक ताणही आहे. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी आणि या नोकरदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.