आमदार निकोलेंनी भूकंपग्रस्तांसाठी केली ५ कोटींची मागणी

पालघर: पालघर(palghar) जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भूकंपग्रस्तांना(earthquake affected) कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी करताना सांगितले असून महाराष्ट्र राज्य मंत्रालय भूकंप व पुनर्वसन मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून ५ कोटीची मागणी करत या भागाची पाहणी करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान आ. निकोले यांनी सतत होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत होत असल्याने डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, पुंजावे, चिंचले येथील भूकंपग्रस्त घरांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भूकंपग्रस्त बाधितांना मदत म्हणून अन्नधान्याचे वाटप केले. तसेच त्यांना धीर देत लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई, टेन्टची संख्या वाढवणे तसेच इतर समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे. त्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात सतत भूकंपाचे धक्के होत अजून त्याची तीव्रता ही ३.५ पेक्षा अधिक व त्या दरम्यान आहे. परिणामी गोरगरीब आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत तर अनेक जण पूर्णतः बेघर झाले आहेत. भूकंपामुळे संपूर्ण जिल्हा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यातच कोरोनामुळे आदिवासी बंधू-भगिनी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकार कडून ही मदत अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील भूकंपग्रस्तांसाठी तात्काळ ५ कोटी निधी देवून भूकंप व पुनर्वसन मंत्र्यांनी या भागाचा पाहणी दौरा करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली आहे. तसेच डहाणू व तलासरी येथील तहसीलदार यांना भूकंपग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सुचना केल्या आहेत. यावेळी चंद्रकांत गोरखना, डॉ. आदित्य अहिरे, गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.