VASAI VIRAR MUNICIPAL CORPORATION

येत्या १० दिवसांत २०० बेडचे कोविड हॉस्पिटल युद्ध पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित(mp Gavit) यांनी पत्रकारांना दिली. वसई विरार पालिका आयुक्तांनी मात्र पत्रकारांना यावेळी टाळल्याचे समोर आले आहे.

    वसई: वसई (vasai)तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचे थैमान पाहून येत्या १० दिवसांत २०० बेडचे कोविड हॉस्पिटल युद्ध पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित(mp Gavit) यांनी पत्रकारांना दिली. वसई विरार पालिका आयुक्तांनी मात्र पत्रकारांना यावेळी टाळल्याचे समोर आले आहे.

    कोविडने थैमान घातलेले असताना,पालकमंत्री,खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी गायब झाल्याचे वृत्त शुक्रवारच्या अंकात नवराष्ट्रने प्रसिद्ध केले होते.याच दिवशी खासदार गावित यांनी पालिका आयुक्त,गंगाधरण, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा वाळके यांची बैठक घेतली.

    या बैठकीत काय घडले याची माहिती विचारल्यावर बोळींज आणि नालासोपारात २०० बेडचे हॉस्प्टल बनविण्यात येणार असून,त्यातील १० बेड व्हेंटीलेटर आणि १९० बेड ऑक्सिजनयुक्त असतील,असे सांगण्यात आले. हे हॉस्पिटल येत्या १० दिवसांत रुग्णसेवेसाठी सज्ज असेल अशी माहिती यावेळी गावित यांनी पत्रकारांना दिली.

    याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी आयुक्त गंगाथरण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता आयुक्त पत्रकारांना भेटणार नाहीत,असे सांगून सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना परतवून लावले.

    कोरोनासारख्या महामारीत हजारो लोक त्रस्त झालेले असताना,त्यांना कोणतीही शासकीय मदत किंवा अधिकृत माहिती मिळत नाही.त्यामुळे अशा लोकांकडून पत्रकारांकडे सतत विचारणा केली जाते.रेमडेसिवर कुठे,कधी आणि कितीला मिळेल,ऑक्सिजन बेड कुठे आहेत, असे प्रश्‍न विचारले जात आहेत. पालिका आयुक्त गंगाथरण डी यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी आपल्या मुळ स्वभावानुसार पत्रकारांना पुन्हा एकदा टाळल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.