vvmc transport

लॉकडाऊनपुर्वी दररोज लाखो वसईकर मुंबईला जात होते. मुंबईला जाणारी पहाटेची पहिली ट्रेन पकडण्यासाठी आणि रात्रीच्या शेवटच्या ट्रेनने घरी जाण्यासाठी एसटीवर अवलंबून रहावे लागते. त्यात शेतकर्‍यांपासून विद्यार्थी,चाकरमानी आणि रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

वसई : कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे कबुल करून परिवहन सेवा (transport service) बंद करणार्‍या वसई-विरार महापालिकेने (VVMC) उच्च न्यायालयाच अवमान केला आहे. तशी बाब परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.(Municipal Corporation contempt of High Court by shutting down transport service )

लॉकडाऊनपुर्वी दररोज लाखो वसईकर मुंबईला जात होते. मुंबईला जाणारी पहाटेची पहिली ट्रेन पकडण्यासाठी आणि रात्रीच्या शेवटच्या ट्रेनने घरी जाण्यासाठी एसटीवर अवलंबून रहावे लागते. त्यात शेतकर्‍यांपासून विद्यार्थी,चाकरमानी आणि रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यांच्यासाठी कधी डेपोत तर कधी गावात मुक्काम करून लालपरी अहोरात्र सेवा देत होती. मात्र, वसई-विरार महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरु करून ही लालपरी बंद पाडली.

पालिकेची सेवा एसटीच्या सर्व मार्गावर धावत नव्हती आणि सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परिवहनच्या बसेस धावत असल्यामुळे गाव-पाड्यात राहणार्‍या लाखो लोकांना अडकून पडावे लागत होते. त्यामुळे तालुक्यातीव एकंदरीत कामकाजावर विपरीत परिणाम होत होता.

त्यामुळे वसईतील एक शिक्षिका आणि विद्यार्थ्याने एसटी सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची गंभीर दखल घेवून महापालिका बरखास्त करण्याचा इशारा उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर भयभित होवून कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही. असे प्रतिज्ञापत्र महापालिका आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने दाखल केल होते.

त्यामुळे याबाबत उचित दक्षता घेण्याचे निर्देश देवून न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, त्यानंतर एसटी आणि परिवहन या दोन्ही सेवा बंद पडल्या आहेत. परिणामी प्रतिज्ञा पत्र दाखल करून पालिकेने उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार ग्राम स्वराज्य अभियानाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यकडे केली आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यामुळे परिवहन आणि एसटी सेवा सुरु करून पालिकेने न्यायालयाचा अवमान टाळला पाहिजे

-मिलींद खानोलकर,ग्रामस्वराज्य अभियान

परिवहन सेवा सुरू करणे ही सद्यस्थितीत प्रशासकीय बाब आहे. तरीदेखील १ डिसेंबर पासून आ.हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

- अमित वैद्य,माजी सदस्य, परिवहन समिती

महापालिका क्षेत्रात सेवा देण्याचा एस.टी.चा विषय नाही. महापालिकेने सेवा सुरू केल्यानंतर आमची सेवा बंद झाली.याप्रकरणात आम्ही प्रतिज्ञापत्र केले नाही

- राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक पालघर, एस.टी.महामंडळ