congo fever

वसई : पालघर जिल्हयामध्ये(palghar district) गोचिडांमुळे क्रायमिन कांगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण(congo fever) झालेला एकही रुग्ण नाही.गुजरात सीमेनजिकच्या भागातही या आजाराने बाधित रुग्ण नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.

पशुपालक व मांस विक्रेत्यांनी घाबरुन जाऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. कांगोमुळे पशुपालक आणि मांस विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता होती म्हणून पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोगासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले होते.मात्र या रोगाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत जिल्ह्यात नाही, असे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी स्पष्ट केले.

हा विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचिडाद्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो.गोचिड चावल्याने वा बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो.याकरिता केंद्रीय सर्वेक्षण पथकाने पालघर जिल्ह्यात भेट देऊन पाहणी केली.जिल्ह्यातील आरोग्य व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांचे प्रशिक्षण घेऊन या आजाराबाबत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व इतर कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.

या पथकात अहमदाबाद मेडीकल कॉलेजचे डॉ.प्रा.कमलेश उपाध्याय,नॅशनल सेंटर नवी दिल्लीचे डॉ.शंशिकात कुळकर्णी,वैज्ञानिक नॅशनल इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ.योगेश गुरव,कीटकशास्त्रज्ञ एस.एन शर्मा,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांचा समावेश होता.