Now you will get a pipe gas connection for five hundred rupees
आता पाचशे रुपयात पाईप गॅस (MGL) कनेक्शन मिळणार

साडेपाच हजार ऐवजी आता फक्त पाचशे रुपयात पालघर जिल्ह्यातील नागरिकांना पाईप द्वारे गॅस कनेक्शन मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नळाद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे मात्र त्यासाठी साडेपाच हजार रुपये अनामत रक्कम ग्राहकांना भरावी लागणार होती.

  • आ. क्षितीज ठाकूर यांच्या मागणीला यश

वसई : साडेपाच हजार ऐवजी आता फक्त पाचशे रुपयात पालघर जिल्ह्यातील नागरिकांना पाईप द्वारे गॅस कनेक्शन मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नळाद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे मात्र त्यासाठी साडेपाच हजार रुपये अनामत रक्कम ग्राहकांना भरावी लागणार होती.

कोरोनाच्या संकटात सहा महिने बेरोजगार झालेल्या नागरिकांसाठी ही रक्कम खूप मोठी होती. त्यामुळे त्यात सवलत द्यावी अशी मागणी नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी महानगर गॅस कडे केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता गुजरात गॅस लिमिटेड या कंपनीने अनामत रक्कम ९० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडं मोडलं असताना पालघर जिल्ह्यातील नागरिकांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

याआधी पाईपलाईन गॅस पुरवठा करण्यासाठी गुजरात गॅस लिमिटेड ही कंपनी ५,६१८ रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून घेत होती. सध्या कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या पगारांमध्येही कपात करण्यात आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर टाळेबंदीमुळे प्रचंड संकटाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाईपलाईन गॅससाठी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरणेही अनेकांसाठी कठीण होते.

ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार क्षितीज ठाकूर यांनी २८ सप्टेंबर रोजी गुजरात गॅस लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही रक्कम एक तर पूर्ण माफ करावी किंवा निदान नाममात्र रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार क्षितीज ठाकूर यांनी केली होती. या बैठकीचा संदर्भ देत कंपनीचे उपाध्यक्ष नवीन शर्मा यांनी आमदार क्षितीज ठाकूर यांना पत्र पाठवून कंपनीने ही रक्कम ९० टक्क्यांनी कमी करत असल्याचं नमूद केलं आहे.

आ. क्षितिज ठाकूर यांच्या विनंतीला मान देऊन फक्त १० टक्के रक्कम अनामत म्हणून आकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.आता ग्राहकांना साडेपाच हजारां ऐवजी फक्त ५०० रुपये एवढीच अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

नवीन शर्मा, उपाध्यक्ष, गुजरात गॅस लिमिटेड

सध्याची परिस्थिती पाहता, कंपनीने घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. या निर्णयामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आ. क्षितीज ठाकूर